वृत्तसंस्था/ साओ पावलो (ब्राझील)
येथे सुरू असलेल्या 2023 च्या ब्राझील पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने पुरुष एकेरी आणि दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. प्रमोद भगत आणि त्याचा साथीदार सुकान कदम यांनी दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
पद्मश्री पुरस्कार मिळवणारा भारताचा पॅराबॅडमिंटनपटू प्रमोद भगतने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात जपानच्या देसुकी फुजिहाराचा 19-21, 21-19, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तत्पुर्वी प्रमोद भगतने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पेरुच्या डी विनेटीचा 21-7, 21-12 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते.
पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांनी भारताच्या कुमार नितेश आणि तरुण यांचा 21-17, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत भगत आणि कदम यांची गाठ कोरियाच्या डाँगजेई आणि हेवान यांच्याशी होणार आहे. मात्र पुरुष एकेरीत भारताच्या सुकांत कदमला तरुणकडून पराभव पत्करावा लागला होता.









