एलएसीवर गरजणार राफेल अन् सुखोई ः एस-400 हवाईसुरक्षा यंत्रणा तैनात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनसोबतच्या सीमेवरील तणावादरम्यान भारतीय वायुदल पुढील महिन्याच्या प्रारंभी हवाई युद्धाभ्यास करणार आहे. या युद्धाभ्यासाला ‘प्रलय’ नाव देण्यात आले आहे. वायुदलाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक (एलएसी) एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. ही यंत्रणा कुठल्याही प्रकारचे विमान किंवा क्षेपणास्त्राला 400 किलोमीटरच्या अंतरावरूनही नष्ट करू शकते.
1-5 फेब्रुवारीपर्यंत हासीमारा, तेजपूर आणि छाबुआ वायुतळांवरून लढाऊ विमाने शक्तिप्रदर्शनासाठी झेपावणार आहेत. अरुणाचल प्रदेश, आसामसमवेत अन्य राज्यांमध्ये ड्रोन, हेलिकॉप्टर अणि लढाऊ विमाने स्वतःच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करणार आहेत. यात राफेल आणि सुखोई-30, सी130जे हर्क्यूलिस, चिनूक हेवी लिफ्ट, अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि ड्रोन सामील असणार आहेत.
भारतीय आणि चीन सैनिकांदरम्यान अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील यांग्त्सेमध्ये 9 डिसेंबर रोजी हिंसक झटापट झाली होती. या झटापटीच्या दोन दिवसांनी हवाई युद्धाभ्यास करण्यात आला होता. त्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा कमांड स्तरीय युद्धाभ्यास आहे. सीमेवर चीनच्या सातत्याने वाढणाऱया हालचाली पाहता या युद्धाभ्यासातून त्याला संदेश दिला जाणार आहे. मागील 3 वर्षांमध्ये भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनने 50 हजार सैनिकांना तैनात केले आहे.
3,488 किलोमीटर लांब प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. डोकलामच्या भूतानी क्षेत्रातही चीनने पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग दिला आहे. चीनने स्वतःचे प्रमुख वायूतळ होतान, काशगर, गरगुनसा आणि शिगात्सेचा विस्तार घडवून आणला आहे. तर दुसरीकडे भारतीय वायुदल ईशान्येतील वायुतळांवरूर चीनला लागून असलेल्या सीमेवर नजर ठेवून आहे. चीनच्या लढाऊ विमानांनी भारतीय सीमेच्या दिशेने उड्डाण केल्यावर त्वरित प्रत्युत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे.









