वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
19 वर्षाखालील वयोगटाच्या कुच बिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबई संघाविरुद्ध खेळताना कर्नाटकाच्या प्रखर चर्तुवेदीने नाबाद चौरंगी शतक (404 धावा) झळकवले.
कर्नाटक आणि मुंबई यांच्यात या स्पर्धेतील अंतिम सामना येथे खेळविला जात आहे. कर्नाटकाने आपला पहिला डाव 8 बाद 890 धावांवर घोषित केला. चर्तुवेदीने 638 चेंडूत 3 षटकार आणि 46 चौकारांसह नाबाद 404 धावा झळकाविल्या. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये कर्नाटकाच्या प्रखर चर्तुवेदीने युवराज सिंगने नोंदविलेला तसेच 25 वर्षे अबाधित राहिलेला सर्वोच्च धावांचा विक्रम मागे टाकला. युवराज सिंगने 1999 साली पंजाब संघाकडून खेळताना बिहार विरुद्ध 358 धावांची खेळी केली होती.
शिमोगा येथे हा सामना सुरू असून सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर कर्नाटकाने पहिल्या डावातील आघाडीवर कुच बिहार करंडकावर आपले नाव कोरले आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समीत द्रविडने 46 चेंडूत 22 धावा जमविल्या. हर्षिल धर्मानीने 228 चेंडूत 5 षटकार आणि 19 चौकारांसह 169 धावांची खेळी केली. प्रखर चर्तुवेदी आणि धर्मानी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 290 धावांची भागिदारी नोंदविली.









