वाढदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
मडगाव : आपल्या 70 वर्षाच्या प्रवासात प्रकाश शंकर वेळीप यांनी शिक्षण, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात उल्लेखनिय योगदान दिले आहे. त्याचा हा आदर्श एसटी भागातील युवकांनी घ्यावा. युवकांनी स्वता पुरता विचार न करता समाजाचा देखील विचार करावा व त्यासाठी कार्यरत व्हावे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकाश वेळीप यांच्या वाढदिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले. यावेळी व्यासपीठावर जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल, क्रीडामंत्री गोविंद गावडे, आमदार उल्हास तुयेकर, गणेश गांवकर, अल्टोन डिकॉस्ता व सौ. ज्योती प्रकाश वेळीप उपस्थित होत्या. गोवा सरकारच्या वतीने प्रकाश वेळीप यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातून त्यांचा प्रवास सुरू झाला. नंतर ते राजकारणात आले व शिक्षणमंत्री झाले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान दिले. ते सहकारमंत्री झाले व सहकार क्षेत्रात त्यांनी प्रचंड योगदान दिले. केपे अर्बन सोसायटी व आदर्श कृषी सहकारी संस्थेच्या मार्फत त्यांनी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. केपे अर्बनच्या माध्यमांतून शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देणे व शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेल्या पीकांना आदर्श कृषी सहकारी संस्थेच्या वतीने मार्केट उलपब्ध करून देतात. अशा पद्धतीने ते दुहरी चळवळ चालवितात. आपल्या समाजाला प्रोत्साहन देण्याचे काम ते करतात. आपल्या नावाने ट्रस्ट स्थापन करून समाजासाठी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीला गौरवितात. 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या 70 व्यक्तींचा त्यांनी गौरव केला हे कार्य उल्लेखनिय असेच आहे.
मन मिळावू स्वभाव व सहकार क्षेत्रात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा गुण सर्वांनी आत्मसात करण्यासारखाच आहे. वयाच्या 70व्या वर्षी ही त्यांना समाजासाठी कार्य करण्याची आवड आहे. गोवा कृषी पणन मंडळासाठी ते अग्रगण्य पद्धतीने काम करतात. त्यांनी समाजासाठी अशाच पद्धतीने काम करीत रहावे. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे आपले विचार मांडताना म्हणाले की, प्रकाश वेळीप हे शांत व संयमी स्वभावाचे. कोणतीही व्यक्ती आक्रमक पद्धतीने त्यांच्या समोर आली तर तिला शांत करण्याची शैली त्यांच्याकडे आहे. त्यांनी समाजासाठी उल्लेखनिय योगदान दिले आहे. युवा पिढीला त्याचे सदोदित मार्गदर्शन लाभते. समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपल्या स्वागतपर भाषणात प्रकाश वेळीप यांचा गौरव केला. ते म्हणाले की, केपे अर्बन सोसायटीचे ते अध्यक्ष तर आपण उपाध्यक्ष आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही नाते सांभाळले आहे. मध्यतरी प्रकाश वेळीप एका राजकीय पक्षात तर आपण दुसऱ्या राजकीय पक्षात होतो. पण, आम्ही कधीच मैत्रीचे संबंध दुरावू दिले नाहीत. एकमेकांचा आदर राखला. जेव्हा, एखादा प्रसंग आला तर एकमेकांना साथ दिली. आमदार अल्टोन डिकॉस्ता, आमदार उल्हास तुयेकर, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी ही आपले विचार मांडताना प्रकाश वेळीप यांचा गौरव केला. यावेळी प्रकाश वेळीप ट्रस्टचा प्रतिष्ठेचा पुरस्कार विश्वास गावडे यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले.









