मोहालीतील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार
वृत्तसंस्था/ मोहाली
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्यांना मोहालीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.
पंजाबचे पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल सध्या 95 वर्षांचे आहेत. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब आहे. वृद्धापकालीन आजारांशी ते झुंज देत आहेत. गेल्यावषी, जून 2022 मध्ये त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर 2022 रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा पीजीआयमध्ये आणण्यात आले. त्यानंतर जवळपास 6 महिन्यांनंतर आता पुन्हा त्यांना चिंताजनक अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकाशसिंग बादल यांनी 2022 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी 1947 मध्ये राजकारणात पाऊल ठेवले होते. सुरुवातीला त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवत जिंकली होती. त्यानंतर सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला. 1957 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. 1969 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. 1969-70 पर्यंत ते पंचायत राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय इत्यादी मंत्रालयांचे मंत्री होते. याशिवाय ते 1970-71, 1977-80, 1997-2002 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री झाले. याशिवाय 1972, 1980 आणि 2002 मध्ये ते विरोधी पक्षनेतेही होते. एवढेच नाही तर मोरारजी देसाई पंतप्रधान असताना ते खासदार म्हणूनही निवडून आले होते.









