कै. प्रकाश आणि कै. सुभाष हिलगे बंधूंचा अ. भा. मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या संमेलनात चित्र गौरव पुरस्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
सुभाष आणि प्रकाश या हिलगे बंधूंच्या वैभव ऑक्रेस्ट्राने एकेकाळी संपूर्ण राज्यात आपली क्रेझ निर्माण केली होती. हिलगे बंधूंनी राज्यभर हजारो कार्यक्रम करत शहरासह ग्रामीण महाराष्ट्रावर गारूड घातले. अत्याधुनिक वाद्यवृंद, कलाकारांचा मोठा संच घेऊन चित्रपट रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या हिलगे बंधूंनी नंतर चित्रपट निर्मितीतही योगदान दिले. दुर्दैवाने कमी वयात काळाच्या पडद्याआड गेलेल्या या बंधूंचा एकाच व्यासपीठावर मरणोत्तर सन्मान होणार आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातर्फे 27 व 28 एप्रिल रोजी कोल्हापुरात संमेलन होत आहे. या संमेलनात मराठी चित्रपटसृष्टीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये सुभाष आणि प्रकाश हिलगे या बंधूंचाही समावेश आहे. या दोघांना मरणोत्तर चित्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सुभाष हिलगे चित्रपट निर्मात होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती करून उदयोन्मुख कलाकारांना संधी दिली. प्रकाश हिलगे नृत्यदिग्दर्शक होते. त्यांनी अभिनेते, अभिनेत्रींना नृत्याचे धडे दिले. असंख्य मराठी चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शनही केले. या दोन्ही बंधूंनी वैभव ऑक्रेस्टाची स्थापना करून शेकडो कलाकारांना संधी आणि रोजगार दिला. यामध्ये गायक, गायिका, नृत्यांगना, मिमिक्री आर्टीस्ट यांच्यासह इतरांचाही समावेश होता. सुभाष हिलगे यांचे 2012 मध्ये तर प्रकाश हिलगे यांचे 2014 मध्ये निधन झाले. या दोघांच्या पश्चात हिलगे परिवाराने वैभव ऑर्केस्टाच्या माध्यमातून कलेची सेवा सुरू ठेवली आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातर्फे आयोजित संमेलनात एकाच व्यासपीठावर सुभाष आणि प्रकाश या हिलगे बंधूंना मरणोत्तर गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याचा त्यांच्या पश्चात होणारा सन्मान त्यांची आठवण जागी करणारा असल्याची प्रतिक्रिया हिलगे कुटुंबीयांनी दिली. या संमेलन सोहळ्यास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील भाजपचे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,खासदार संजय मंडलिक, खासदार संभाजीराजे छत्रपती ,खासदार राहुल शेवाळे हे प्रमुख अतिथी असणार आहेत.









