ऑनलाईन टीम/तरुण भारत
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यांनतर लगेचच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकेकाळी मुख्यमंत्री म्हणून काम करणारे फडणवीस आता उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. याच गोष्टीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी फडणवीसांना ‘बिचारे देवेंद्र फडणवीस’ म्हणत खोचक ट्वीट केलं आहे.
‘बिचारे देवेंद्र फडणवीस, देवेद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला !’ असं खोचक ट्वीट प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. १९७४ साली शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या मंत्रीमंडळात शरद पवार हे गृहराज्य मंत्री होते. १९७८ साली शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. शरद पवार जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रीमंडळात शंकराव चव्हाण यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलं होतं. एकेकाळी मुख्यमंत्री म्हणून काम करणारे शंकरराव चव्हाण नंतर पवारांच्या काळात मंत्री म्हणून काम करत होते. याचाच संदर्भ देत आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
हेही वाचा : शपथविधीनंतर एकनाथ शिंदे गोव्यात; आमदारांनी केलं जंगी स्वागत