जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संभाव्य पूरस्थितीसंदर्भातील आढावा बैठकीत बोलत होते
कोल्हापूर : अलमट्टी धरणाच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून रहा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. अलमट्टी धरणाच्या ठिकाणी सध्या सेवानिवृत्त अभियंताची नेमणूक केल्याची माहिती आहे. असे होऊ नये. कार्यरत आणि अनुभवी अभियंताची नेमणूक तेथे करावी. हिप्परगी येथीलही जबाबदारी त्यांच्यावरच द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संभाव्य पूरस्थितीसंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, घरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करा, पुरामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी अलमट्टी धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवावा, भूस्खलनाच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करा. काही ठिकाणी समस्या मानवांच्या चुकीमुळे होत आहेत. बांधकामवेळी जादा खोदाई केली जाते.
पावसात अशी ठिकाणी भूस्खलनाचा धोका असतो. अशांवर नोटीस काढुन कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी तलाठी, ग्रामसेवकांना दिल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गतवर्षी समन्वय योग्य झाल्यानेच पूर स्थिती नियंत्रणात आली. भूस्खलन गावाचा ऑडीट करण्यासाठी समिती गठीत करुन अभ्यास केला जाईल. तसेच त्या गावांचा भौगोलिक अभ्यास करण्यासाठी आयआयटी मंडी याच्यासोबत करार झाला आहे.
त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील नियोजन करु. यावेळी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत केलेले नियोजन व उपाययोजना बाबत माहिती आपत्ती व्यववस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांनी माहिती दिली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी ९८ टक्के नाले सफाई झाल्याचे सांगितले.
अलमट्टीतून ७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
गेल्या चार वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत जादा पाऊस झाला आहे. धरणातील पाण्याची पातळीडी दुप्पटीने वाढली आहे. पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अलमट्टी धरण प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. अलमट्टी धरणात सध्या ६८ टीएमसी पाणीसाठा आहे.
७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. हिप्परगी धरणात जेवढे पाणी येते तेवढेच सोडले जात असल्याची माहिती प्रसाद संकपाळ यांनी दिली. अलमट्टीची पाण्याची पातळी ५१७ फुटावर जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना तेथील प्रशासनला दिल्या आहेत. त्यांनी याची दक्षता घेतली जाईल, याची ग्वाही दिली आहे.
अवकाळी पावसातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण
मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकासह अन्य घटकांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनाने सर्व पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
ब्ल्यू लाईनचे काम सुरू
२०१९ आणि २०२१ च्या महापूरानंतर ब्ल्यूलाईन नव्याने करण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. ९०० किमी. अंतरापैकी १२५ कि. मी. अंतराचे काम झाले आहे. उर्वरीत कामांचा सर्व्हे झाल्यानंतर काम पूर्ण होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.








