उच्च न्यायालयाने खासदारकी ठरविली अवैध : देवेगौडा कुटुंबीयांना धक्का, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
हासन लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना उच्च न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. प्रज्ज्वल हे देवेगौडा यांचे नातू तर निजदचे वरिष्ठ नेते एच. डी. रेवण्णा यांचे पुत्र आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेचा योग्य रितीने तपशिल सादर केलेला नाही, असा आरोप त्यांच्यावर होता. हा आरोप सिद्ध झाल्याने प्रज्ज्वल यांची लोकसभेवरील निवड अवैध असल्याचा निकाल न्यायमूर्ती नटराजन यांनी शुक्रवारी दिला.
18 एप्रिल 2019 रोजी प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका भाजपचे पराभूत उमेदवार (सध्या निजदचे आमदार) ए. मंजू आणि मतदार जी. देवराजेगौडा यांनी दाखल केल्या होत्या. सदर याचिकाकर्त्यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला आहे. मात्र, ए. मंजू भ्रष्टाचारात सामील असल्याने त्यांना विजयी उमेदवार म्हणून घोषणा करण्यासंबंधी याचिकाकर्त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
प्रज्ज्वल यांनी, चेन्नांबिका कन्व्हेन्शन सेंटरचे किमान मूल्य 5 कोटी रुपये असताना उमेदवारी अर्जात केवळ 14 लाख रु. दाखविले होते. बँक खात्यात 5 लाख रुपये असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, त्यांच्या नावे 48 लाख रुपयांच्या ठेवी असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रज्ज्वल यांच्या अनेक बेनामी मालमत्ता आहेत. त्यांनी प्राप्तिकर चुकविला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. आपल्याविरुद्ध आलेल्या निकालाला प्रज्ज्वल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वकिलांशी चर्चा सुरू केल्याचे समजते.
निजदचा एकच खासदार; तोही अपात्र
2019 पूर्वी माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी हासन लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत आपल्या नातवासाठी देवेगौडांनी तो मतदारसंघ सोडून दिला होता. त्यात प्रज्ज्वल निवडूनही आले होते. ते निजदचे एकमात्र खासदार होते. आता त्यांना खासदारपदी अपात्र ठरविण्यात आले आहे.
याचिकाकर्ते ए. मंजू सध्या निजदचे आमदार
याचिकाकर्ते ए. मंजू 2019 मध्ये भाजपमध्ये होते. मे 2023 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निजदमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रज्ज्वल रेवण्णा यांची खासदारकी अवैध ठरविण्यात आली आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना ए. मंजू यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मी निजदमधून आमदार बनलो आहे. प्रकरणाचा विषय वेगळा. त्यामुळे पक्षात प्रवेश करण्याचा सल्ला आपल्याला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी दिला होता. त्यांच्या सल्ल्यानुसार भाजप सोडून निजदप्रवेश केला होता. निजदप्रवेशावेळी मी कोणत्याही अटी घातल्या नव्हत्या.
रेवण्णा, मंजूही अपात्र ठरणार?
प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याप्रमाणे माजी मंत्री एच. डी. रेवण्णा आणि निजदचे आमदार ए. मंजू हे देखील अपात्र ठरणार आहेत, असे भाजप नेत्या व ज्येष्ठ वकील प्रमिळा नेसरगी यांनी सांगितले. कोणतीही निवडणूक लढविण्याआधी मालमत्ता, बँकेचा तपशिल, जमीन व इतर मालमत्तेचा तपशिल योग्य रितीने सादर करावा लागतो. मात्र, प्रज्ज्वल यांनी योग्य तपशिल न दिल्याने त्यांना न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. प्रज्ज्वल यांना त्यांचे वडील एच. डी. रेवण्णा यांनीही सहकार्य केले आहे. त्यामुळे रेवण्णा हे देखील दोषी ठरतात. त्यांना अपात्र ठरविण्यासंबंधी आम्ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने रेवण्णा यांना नोटीस बजावली आहे. ए. मंजू यांना प्रज्ज्वल यांनीही आव्हान दिले होते. त्यामुळे न्यायालयाने मंजू यांनाही नोटीस जारी करून तुम्हाला का अपात्र ठरवू नये, अशी विचारणा केली आहे. या दोघांविरुद्ध कायदेशीर लढा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रमिळा नेसरगी यांनी सांगितले.
निकाल मान्य!
न्यायालयाचा निकाल मान्य करत आहे. कितीही मोठी व्यक्ती असली तरी कायद्याचा गौरव केला पाहिजे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देण्याविषयी प्रज्ज्वल वकिलांशी चर्चा करून निर्णय घेऊ शकेल.
– एच. डी. रेवण्णा, निजद वरिष्ठ नेते
खोटी माहिती दिल्याने कारवाई!
माझ्या कायदेशीर लढ्याला न्याय मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करत आहे. खोटी माहिती दिल्याने न्यायालयाने प्रज्ज्वल रेवण्णा यांना अपात्र ठरविले आहे. त्यांना आपण योग्य असल्याचे सिद्ध करायचे असेल तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा सुरू ठेवावा.
– ए. मंजू, निजद आमदार









