वृत्तसंस्था/ विज्क आन झी (नेदरलँड्स)
भारताचा बुद्धिबळातील किशोरवयीन सुपरस्टार आर. प्रज्ञानंदने येथे टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून एका मोठ्या धक्क्याची नोंद केली. या विजयाने त्याला ‘फिडे रेटिंग’मध्ये अव्वल भारतीय खेळाडू. या नात्याने महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला मागे टाकण्यास मदत केली आहे.
मंगळवारी रात्री उशिरा मिळविलेल्या या विजयानंतर ‘फिडे’ लाइव्ह रेटिंगमध्ये 18 वर्षीय प्रज्ञानंदचे 2748.3 गुण झाले आहेत, तर पाचवेळचा विश्वविजेता आनंदचे 2748 गुण झाले आहेत. जागतिक बुद्धिबळ संघटना दर महिन्याच्या सुऊवातीला रेटिंग प्रसिद्ध करते. काळ्या सेंगट्या घेऊन खेळणाऱ्या प्रज्ञानंदने 62 चालींत हा विजय नोंदविला. ‘क्लासिकल चेस’मध्ये विद्यमान जगज्जेत्याला पराभूत करणारा प्रज्ञानंद हा आनंदनंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे.
2023 च्या टाटा स्टील स्पर्धेतही प्रज्ञानंदने लिरेनचा पराभव केला होता. तो आता मास्टर्स स्पर्धेत 2.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हा किशोरवयीन भारतीय ग्रँडमास्टर अलीकडच्या काळात चांगल्या फॉर्ममध्ये राहिलेला आहे. त्याला गेल्या वर्षी मॅग्नस कार्लसनसमोर पराभव पत्करावा लागल्याने विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त झाले होते. मात्र त्यासरशी एप्रिलमध्ये लिरेनला आव्हान देणारा स्पर्धक निश्चित करण्यासाठी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी त्याने पात्रता मिळवली होती.
डच खेळाडू अनीश गिरी हा आघाडीवर असून भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशवर विजय मिळवून तो 3.5 गुणांवर पोहोचला आहे. अलीरेझा फिरोज्जा 3 गुणांनिशी त्याच्याहून अर्ध्या गुणाने मागे आहे. रिंगणातील तिसरा भारतीय खेळाडू विदित संतोष गुजराथी याला चौथ्या फेरीत जॉर्डन व्हॅन फॉरेस्टने बरोबरीत रोखले. त्याचे चार फेऱ्यांतून 2 गुण झाले आहेत.









