वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका`
सिंकफिल्ड कपच्या चौथ्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला अमेरिकेच्या सॅम्युअल सेव्हियनने सोप्या पद्धतीने बरोबरीत रोखले, तर विश्वविजेता डी. गुकेशने फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्हबरोबरचा सामना बरोबरीत सोडविला. अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाने दिवसाच्या एकमेव निर्णायक सामन्यात उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हला हरवून गेल्या दोन दिवसांतील आपला दुसरा विजय मिळवला. इतर सामन्यांमध्ये अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनने पोलंडच्या डुडा जान-क्रिझीस्टोफशी आणि फ्रेंच अलिरेझा फिरोजाने वेस्ली सोशी बरोबरी साधली.
पाच फेऱ्या अजून बाकी असताना काऊआनाने चार सामन्यांमधून तीन गुणांसह एकट्याने आघाडी घेतली आहे आणि त्यानंतर प्रज्ञानंद आणि अॅरोनियन प्रत्येकी 2.5 गुणांसह आहेत. वेस्ली, फिरोजा, वाचियर-लाग्रेव्ह, सेव्हियन आणि गुकेश हे पाच खेळाडू प्रत्येकी दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. डुडा त्याच्यापेक्षा अर्धा गुण मागे आहे,तर अब्दुसत्तोरोव्ह फक्त अर्धा गुण घेऊन गुणतालिकेच्या तळाशी आहे.
प्रज्ञानंदला क्वीन्स गॅम्बिटचा सामना करावा लागला आणि सेव्हियनच्या मार्गात कोणतीही वास्तविक समस्या तो निर्माण करू शकला नाही. मधल्या खेळात बऱ्याच घडामोडी घडल्या असल्या, तरी लवकरच तो सामना अनिर्णीतावस्थेत संपला. दिवसाच्या दुसऱ्या क्वीन पॉन गेमचा वापर झालेल्या लढतीत वाचियर-लाग्रेव्हने कठोर प्रतिकार केल्याने गुकेशलाही त्याच्या पांढऱ्या सोंगाट्यांचा फारसा वापर करता आला नाही. दोन्ही खेळाडूंनी स्वत:ला टिकवून ठेवले असले, तरी विजयाच्या फारशा आशा नव्हत्या आणि बरोबरी हा निकाल योग्य ठरला.
दुसरीकडे, नोदिरबेकचा विजयाचा शोध सुरूच राहिला. कारण काऊआनाने त्याच्याविरुद्ध जबरदस्त खेळ केला. अब्दुसत्तोरोव्हने फक्त 30 चालींमध्ये पराभव पत्करला. 10 खेळाडूंमध्ये नऊ फेऱ्यांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकूण 3,50,000 अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.









