वृत्तसंस्था/ कोलकाता
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 30 ऑगस्टपासून येथे आयोजित केलेल्या 4 दिवसांच्या रणनितीच्या सराव शिबिरात भारताचा ग्रँडमास्टर्स तसेच विश्व चषक बुद्धिबळ स्पर्धेतील उपविजेता व रौप्यपदकधारक रमेशबाबू प्रज्ञानंद तसेच आर. गुकेश यांच्यासह अन्य तीन बुद्धिबळपटूंचा समावेश राहणार आहे.
या आगामी सराव शिबिरात ग्रँडमास्टर्स विदीत गुजराती, अर्जुन इरीगेसी तसेच अनुभवी पी. हरिकृष्णा हे सहभागी होत आहेत. सप्टेंबर महिन्यात चीनच्या हेंगझोयू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या बुद्धिबळपटूंना या शिबिरामध्ये तांत्रिक सरावाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. भारतीय बुद्धिबळ संघाला प्रमुख प्रशिक्षक ग्रँडमास्टर बोरीस गेलफँड तसेच प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन, सहाय्यक प्रशिक्षक वैभव सुरी यांनी अर्जुन कल्याण यांचे मार्गदर्शन मिळत आहे. आशियाई स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महिला बुद्धिबळपटूंसाठी सध्या प्रशिक्षण शिबिर सुरू असून ते मंगळवारी समाप्त होणार आहे. महिला विभागात कोनेरू हंपी, डी. हरिका, वैशाली रमेशबाबू, वंटिका अगरवाल आणि सविता श्री यांचा समावेश आहे. दरम्यान 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान पाचवी टाटा स्टील पुरस्कृत अखिल भारतीय रॅपिड आणि ब्लिझ बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. आशियाई स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले भारतीय बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.









