वृत्तसंस्था/ प्राग
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने येथे चालू असलेल्या प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील अव्वल स्थानावर दावा करताना सोमवारी आघाडीवर राहिलेल्या उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोवचा पराभव केला. काळ्या सोंगाट्यांसह खेळणारा प्रज्ञानंद हा विजय मिळविल्याने दहा खेळाडूंच्या साखळी पद्धतीने खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या एकमेव खेळाडूच्या लक्षणीय इतका जवळ पेहोचला आहे. या स्पर्धेच्या अद्याप तीन फेऱ्या शिल्लक आहेत.
द्वितीय क्रमांकावर असलेला इराणचा परहम मगसुदलू झेक प्रजासत्ताकच्या नगुयेन थाई दाई व्हॅनकडून पराभूत झाल्याने प्रज्ञानंदसाठी परिस्थिती आणखी चांगली झाली आहे. परिणामी, अब्दुसत्तारोव्हने 4 गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे आणि आता प्रज्ञानंद रुमानियाचा रिचर्ड रॅपोर्ट आणि मगसुदलू हे प्रत्येकी 3.5 गुणांनिशी त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहेत.
प्रतिस्पर्ध्याला काहीही संधी न देता प्रज्ञानंद आपल्या खेळात अव्वल राहिला. जसजसा खेळ पुढे सरकत गेला तसतशा अब्दुसत्तारोव्हसाठी गोष्टी अवघड होऊ लागल्या आणि शेवटी त्याला हार पत्करावी लागली. डी. गुकेशसाठी मात्र दिवस कठीण गेला. तळाशी असलेल्या मॅट्युझ बार्टेलशी त्याचा सामना होता. पांढऱ्या सोंगाट्यासह खेळणारा गुकेश विजयी होईल अशी अपेक्षा होती. परंतु त्याला पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, विदित गुजराथीला देखील जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरकडून पराभव स्वीकारावा लागला. हा भारतीय खेळाडूंना मिळालेला आणखी एक धक्का होता.









