पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्यातही कार्लसनला बरोबरीत रोखण्यात प्रज्ञानंदला यश, आज टायब्रेकर लढतीत निकाल लागणार
वृत्तसंस्था/ बाकू (अझरबैजान)
‘फिडे’ बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सध्या उत्कंठावर्धक परिस्थिती निर्माण झालेली असून पहिल्या गेमप्रमाणे दुसऱ्या गेममध्येही मॅग्नस कार्लसनशी भारताच्या आर. प्रज्ञानंदने बरोबरी साधल्याने अंतिम फेरीचा सोक्षमोक्ष देखील टायब्रेकरमध्ये लागणार आहे. यामुळे आता आज 24 रोजी विजेता कोण याचा निर्णय होणार आहे.

दोन सामन्यांच्या दुसऱ्या गेममध्ये पांढरी प्यादी घेऊन खेळण्याची अनुकूलता कार्लसनकडे होती. पण त्याचा तो फायदा उठवू शकला नाही आणि त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. मंगळवारी झालेल्या अंतिम फेरीतील पहिल्या क्लासिकल गेममध्येही भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने समर्थपणे बचाव करत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला यशस्वीरीत्या रोखले होते आणि 35 चालींमध्ये बरोबरीवर सामना सोडविण्यास भाग पाडले होते.
वेळेचा अभाव जाणवत असतानाही प्रज्ञानंदने चांगला खेळ केला आणि नंतर सामना बरोबरीत सोडविण्यास सहमती दिली. मला वाटत नाही की, मी कसल्याही पेचात सापडलो होतो, असे त्याने पहिल्या सामन्यानंतर बोलताना सांगितले होते. ‘मला वाटले की, मी तिथे काही तरी करायला हवे होते. परंतु कदाचित ती स्थिती भक्कम होती आणि माझ्याकडे काहीही नव्हते. मी तिथे जो खेळ केला ते सर्वोत्तम प्रयत्न नव्हते, पण मला काहीही सापडले नाही’, असे ‘फिडे’च्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर पोस्ट केलेल्या संवादात प्रज्ञानंदने नंतर म्हटले होते. त्यावेळी
कार्लसनविऊद्धच्या दुसऱ्या सामन्याबद्दल प्रज्ञानंद म्हणाला होता की, ही लढत रंगेल. तो नक्कीच खूप प्रयत्न करेल. मी विश्रांती घेण्याचा आणि ताजेतवाने होऊन येण्याचा प्रयत्न करेन. पण बुधवारी झालेली ही दुसरी गेमही बरोबरीत सुटली. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे परिस्थिती ठीक नसलेल्या कार्लसनने सांगितले की, त्याला विश्रांती मिळाली असली, तरी त्याची शारीरिक स्थिती चांगली नव्हती.
‘फूड पॉयझनिंग’मुळे स्थिती बिघडली : कार्लसन
‘सोमवारी प्रज्ञानंदला कठीण टायब्रेकर लढत खेळावी लागली तेव्हा मला विश्रांती मिळाली. सहसा अशा परिस्थितीमुळे मला अनुकूलता प्राप्त होते. पण गेल्या काही दिवसांपासून मी खूपच खराब स्थितीत आहे’, असे कार्लसनने मंगळवारी लढतीनंतर सांगितले. (निजात) आबासोव्हविऊद्धच्या सामन्यानंतर मला अन्नातून विषबाधा झाली. गेल्या दोन दिवसांपासून मला नीट जेवता आले नाही. याचा अर्थ असाही होतो की मी खरोखरच शांत होतो. कारण माझ्यात चिंताग्रस्त होण्याची शक्ती नव्हती, असे या नॉर्वेच्या खेळाडूने आपल्या प्रतिक्रियेला मस्करीचे वळण देताना म्हटले होते.
18 वर्षीय प्रज्ञानंदने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचताना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो काऊआनाचा पराभव केला होता आणि त्याची आई देखील यावेळी उपस्थित होती. दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो देशातील दुसरा खेळाडू ठरला असून 2024 मधील कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.









