दहा दिवसात चंद्राच्या पृष्ठभागावर कापले 101 मीटर अंतर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरने शिवशक्ती लँडिंग पॉईंटपासून 100 मीटर अंतर कापले आहे. इस्रोने शनिवार, 2 सप्टेंबरला लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्यातील अंतराचा आलेख शेअर केला. या इमेजमध्ये लँडरमधून उतरल्यानंतर प्रज्ञान पश्चिमेकडे सरकत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुढे तो दिशा बदलून उत्तरेकडे गेला असून गेल्या दहा दिवसात 101 मीटर अंतर कापले असून अजूनही त्याचे मार्गक्रमण सुरू आहे.

चांद्रयान-3 च्या चंद्रावर उतरण्याला आता दहा दिवस उलटून गेले आहेत. आतापर्यंत मोहीम यशस्वीपणे सुरू असून ‘प्रज्ञान’ रोव्हर आणि ‘विक्रम’ लँडर या दोघांकडूनही परस्परपूरक काम केले जात आहे. या काळात सातत्याने इस्रोला फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती प्राप्त होत असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांपर्यंतही पोहोचवली जात आहे. शनिवारी इस्रोने 50×50 स्केलच्या आधारे आलेख तयार करून व्हायरल केला आहे. ही अपडेट्स देताना इस्रोने ‘प्रज्ञान नाबाद 100’ अशी टॅगलाईन वापरली आहे. या आलेखात रोव्हरने 101.4 मीटरचे अंतर कापल्याचे दिसत आहे. हे अंतर कापण्यासाठी रोव्हरला 10 दिवस लागले. विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरला होता.
आता स्लीप मोडची तयारी
चंद्राची रात्र जवळ आल्यामुळे इस्रो चांद्रयान-3 ला स्लीप मोडमध्ये ठेवण्याच्या तयारीत आहे. चांद्रयान-3 मोहीम 14 दिवसांची आहे. 2 सप्टेंबर हा त्याचा 11 वा दिवस आहे. म्हणजे प्रज्ञानकडे दक्षिण ध्रुव संशोधनासाठी अजून 3 दिवस शिल्लक आहेत. चंद्रावर 14 दिवस रात्र आणि 14 दिवस प्रकाश असतो. रात्र असताना तेथे तापमान उणे 100 अंश सेल्सिअसच्या खाली जाते. मात्र, चांद्रयानचे लँडर आणि रोव्हर आपल्या सोलर पॅनलमधून ऊर्जा निर्माण करत असल्याचे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
इस्रोसाठी 14 दिवसच अतिमहत्त्वाचे
मोहिमेदरम्यान रोव्हर-लँडर 14 दिवस वीजनिर्मिती करेल, परंतु रात्र पडल्यावर वीजनिर्मिती प्रक्रिया थांबेल. वीजनिर्मिती न झाल्यास, इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्रचंड थंडीचा सामना करू शकणार नसल्यामुळे खराब होऊ शकतात. परिणामी, 14 दिवसांनंतर ते बंद पडू शकते किंवा पुन्हा प्रज्वलितही होऊ शकते. मात्र, इस्रोने त्याची कार्यक्षमता अधिकाधिक वाढवण्याच्यादृष्टीने नियोजन केल्यामुळे अजूनही काही दिवस दोन्ही उपकरणांकडून ठोस माहिती प्राप्त होऊ शकते. मात्र, त्याबाबत खात्री बाळगता येत नसल्याने इस्रोने केवळ 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी निश्चित केलेला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने रोव्हरच्या पुढील वाटचालीसाठी सुरक्षित मार्गाच्या शोधात रोव्हरला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ही रोटेशन प्रक्रिया लँडर इमेजर पॅमेऱ्याने टिपली आहे. चांद्रयान-3 च्या यशाने भारत हा चंद्राच्या तुलनेने मोठ्या, अस्पर्शित दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला आहे. आतापर्यंत अतिशय रितसरपणे मोहीम सुरू असून बरीच माहिती इस्रोला प्राप्त झाली आहे. या माहितीचे पृथक्करण आणि सखोल अभ्यास करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या माहितीतून नजिकच्या काळात अनेक पैलूंवर प्रकाश पडणार असून भारतासह जगभरातील विविध शास्त्रज्ञ आणि संशोधकांना त्याचा लाभ होणार आहे.









