अंधारामुळे पुढील 14 दिवस विश्र्रांती घेणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेतील प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर आपले काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. 23 ऑगस्ट रोजी लँडर विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच प्रज्ञान रोव्हर अॅक्शन मोडमध्ये आला. आता त्याने पहिल्या टप्प्यात आपले कार्य पूर्ण केल्यानंतर ते पुढील 14 दिवस चंद्रावर विश्र्रांती घेईल, असे रविवारी इस्रोने ट्विट करून स्पष्ट केले.
प्रज्ञान रोव्हरने आपले कार्य पूर्ण केले आहे. इस्रोने आता त्याला सुरक्षितपणे पार्क केले असून स्लीप मोडवर सेट केले आहे. एपीएक्सएस आणि एलआयबीएस हे दोन्ही पेलोड्सही बंद करण्यात आले आहेत. या पेलोड्समधील डेटा लँडरद्वारे पृथ्वीवर प्रसारित केला जातो. आता 22 सप्टेंबरला सूर्यप्रकाश चंद्रावर येईल. सूर्य उगवल्यानंतर रोव्हर स्लीप मोडमधून जागा होऊन पुन्हा कामाला सुऊवात करेल.
चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीयांचा इस्रोवर प्रचंड विश्वास दिसून येत आहे. इस्रोच्या नियोजनानुसार दुसऱ्या टप्प्यातही प्रज्ञान रोव्हर सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. जर प्रज्ञान सक्रिय झाला नसला तरी तो भारताचा ‘चंद्रदूत’ म्हणून नेहमी तिथे कार्यरत राहणार आहे. इस्रोच्या घोषणेनंतर भारतीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रज्ञान पुन्हा जागृत होण्यासाठी भारतीयांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. सुरुवातीला चांद्रयान-3 आणि आता सूर्य मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.









