वृत्तसंस्था/ प्राग
प्राग मास्टर्सच्या तिसऱ्या फेरीत ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने झेक प्रजासत्ताकच्या न्गुयेन थाई दाई व्हॅनविऊद्ध सहज विजय मिळवला, तर अरविंद चिदंबरमने अव्वल मानांकित चीनच्या वेई याचा पराभव करून आघाडीवर स्थान मिळवले. या स्पर्धेच्या किताबाचा सर्वांत मोठा दावेदार मानल्या जाणाऱ्या प्रज्ञानंदचा हा जलद आणि वर्चस्व दाखवून देणारा विजय होता.
प्रज्ञानंदच्या सामन्यात 14 व्या चालीवरच निर्णायक क्षण येऊन त्याला निर्विवाद फायदा मिळाला. त्यानंतर खेळात काही वळणे आली असली, तरी निकाल निश्चित झाला होता. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये सामने बरोबरीत सोडविलेल्या प्रज्ञानंदसाठी हा एक महत्त्वाचा विजय होता. दुसरीकडे, त्याचा सहकारी अरविंद चिदंबरमने पहिल्यांदाच लाईव्ह रेटिंगमध्ये जागतिक टॉप-20 मध्ये प्रवेश करून एलिट वर्तुळात आगमन केले आहे.
चिनी खेळाडू काळ्या सोंगाट्या घेऊन खेळत असताना अरविंदने सुरुवातीच्या खेळाच्या बाबतीत सखोल समज दाखवली. हा गेम 44 चालींपर्यंत चालला. दुसरीकडे, अमेरिकन सॅम शँकलँड जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरकडून पराभूत झाला. तिसऱ्या फेरीतील विजयामुळे अरविंदचे 2.5 गुण झाले असून दुसऱ्या स्थानावर आता प्रज्ञानंद आणि कीमर प्रत्येकी दोन गुणांसह आहेत. चौथ्या स्थानावर व्हिएतनामचा क्वांग लेम ले, चेक प्रजासत्ताकचा डेव्हिड नवारा, हॉलंडचा अनीश गिरी आणि शँकलँड आहेत. ते तुर्कीच्या दाई व्हॅन आणि गुरेल एडिझपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहेत.
अव्वल मानांकित वेई यी आश्चर्यकारकपणे तळाशी आहे आणि 10 खेळाडूंच्या या राउंड-रॉबिन स्पर्धेत अद्याप सहा फेऱ्या शिल्लक आहेत. दरम्यान, चॅलेंजर्स विभागात दिव्या देशमुखला तीन दिवसांतील तिचा दुसरा पराभव पत्करावा लागला. ती उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबबोएव्हकडून पराभूत झाली.









