प्राग (झेक प्रजासत्ताक)
ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने दुसऱ्या दिवशीच्या धावपळीत चूक केली आणि येथे सुरू असलेल्या प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत त्याला रुमानियाच्या रिचर्ड रॅपोर्टकडून पराभव पत्करावा लागला. विश्वनाथन आनंदच्या पुढे जाऊन थेट रेटिंग यादीत अव्वल भारतीय ठरण्याचा मान मिळविलेल्या या खेळाडूला हा धक्का महागात पडलेला असून आता 10 खेळाडूंच्या साखळी स्पर्धेच्या शेवटच्या सहा फेऱ्यांत त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. .
या स्पर्धेत असलेली संधी वाया घालविणारा प्रज्ञानंद हा केवळ एकटाच बुद्धिबळपटू नव्हता. उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोव्हनेही स्थानिक स्टार डेव्हिड नवारा याच्यावर जवळपास निराशाजनक स्थितीतून बाजी उलटविली. नवारा विजय मिळविण्याच्या स्थितीत पोहोचला होता, पण दबावाला तोंड देण्यात तो अपयशी ठरला.
विदित गुजराथी आणि डी. गुकेश यांच्यातील सामना एकाही खेळाडूला आपली बाजू रेटता न आल्याने बरोबरीत संपली, तर आदल्या दिवशी पहिल्या स्थानावर राहिलेला इराणचा खेळाडू परहम मगसुदलू याला जर्मनीचा अव्वल खेळाडू व्हिन्सेंट कीमरने बरोबरीत रोखले. दिवसाच्या इतर सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या गुयेन थान दाई व्हॅनने पोलंडच्या मातेउज बार्टेलचा पराभव केला.
सध्या अब्दुसत्तारोव्ह 2.5 गुणांसह मगसुदलूसमवेत आघाडीवर पोहोचला आहे आणि गुकेश आणि रॅपोर्ट हे प्रत्येकी 2 गुणांसह त्यांच्या मागोमाग आहेत. गुजराथी 1.5 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे आणि प्रज्ञानंद, नवारा, दाई व्हॅन तसेच कीमर यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहे. अवघ्या अर्ध्या गुणासह बार्टेल गुणतालिकेत तळाशी आहे.
दरम्यान, चीनमधील शेनझेनमधून आलेल्या अन्य वृत्तानुसार, अर्जुन एरिगेसी शेनझेन मास्टर्सच्या पहिल्या फेरीत चीनच्या शियांग्यू यूचा पराभव करून भारताचा नवा ‘नंबर वन’ बुद्धिबळपटू बनला आहे.









