वृत्तसंस्था/ प्राग (झेक प्रजासत्ताक)
‘टाटा स्टील मास्टर्स’मध्ये अप्रतिम कामगिरी केलेला ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद हा आज बुधवारपासून येथे सुरू होणाऱ्या प्राग मास्टर्स स्पर्धेचा किताब जिंकण्याच्या दृष्टीने भक्कम दावेदार म्हणून सुऊवात करेल. टाटा स्टील मास्टर्समध्ये कठीण वाटचालीनंतर प्रज्ञानंदने जेतेपद मिळविले होते. तिथ त्याने टायब्रेकर लढतीत विश्वविजेता डी. गुकेशवर मात केली होती आणि आता या स्पर्धेत तोच वेग पुढे नेण्याचा प्रयत्न तो करेल.
गेल्या वर्षी कामगिरी आणि रेटिंगमध्ये सातत्यपूर्ण वाढ झाल्यामुळे ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने एलिट बुद्धिबळात पदार्पण केल आहे. लाईव्ह रेटिंगमध्ये स्वत:ला 2730 गुणांपर्यंत पोहोचवून अरविंदने जागतिक क्रमवारीतील ‘टॉप 20’मध्ये प्रवेश केला आहे आणि सध्या तो गुकेश, अर्जुन एरिगेसी, प्रज्ञानंद आणि पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्या मागे देशात पाचव्या क्रमांकावर आहे.
1 फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या रेटिंगनुसार चिनी ग्रँडमास्टर वेई यी अव्वल मानांकित म्हणून सुऊवात करतेल, तर प्रज्ञानंद दुसऱ्या स्थानावर आहे. व्हिएतनामचा ले क्वांग लीम जर्मनीच्या विन्सेंट कीमरपेक्षा पुढे तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर अरविंद 10 खेळाडूंच्या तसेच 9 फेऱ्यांच्या संपूर्णपणे ‘प्ले-ऑल’ पद्धतीच्या या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आहे. डच ग्रँडमास्टर अनीश गिरी यात सहभागी झालेला असून आपल्या मोठ्या तयारीमुळे तो येथे लक्ष वेधून घेऊ शकतो. सर्वोत्तम झेक खेळाडू डेव्हिड नवारा, न्गुयेन थाई दाई व्हॅन, अमेरिकेचा सॅम शँकलँड आणि तऊण खेळाडू एडिल गुरेझ हे या स्पर्धेत सहभागी झालेले अन्य खेळाडू आहेत.
प्रज्ञानंदसाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण या भारतीय खेळाडूकडे कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला मागे टाकण्याची क्षमता आहे. आकडेवारीवर आधारित विश्लेषणानुसार प्रज्ञानंद स्पर्धा जिंकण्याची शक्यता 14.98 टक्के म्हणजे वेई यीपेक्षा (10.52 टक्के) जास्त आहे. अरविंद देखील आपली उपस्थिती दाखविण्याचा प्रयत्न करेल. कारण त्याच्याकडे दृढनिश्चय आणि कौशल्य आहे. यामुळे तो काही विजय मिळवू शकतो. तथापि, सातत्य राखणे त्याच्यासाठी महत्त्वाचे असेल. भारतीय आव्हान चॅलेंजर्स विभागातही असून तिथे दिव्या देशमुख काही मजबूत ग्रँडमास्टर्सचा सामना करेल. दोन्ही विभागांची पहिली फेरी आज बुधवारपासून सुरू होईल.









