वृत्तसंस्था/ बुखारेस्ट
ग्रँड चेस टूरचा एक भाग असलेल्या सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक्समध्ये भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पोलंडच्या दुडा जान-क्रिज्स्टोफसोबत बरोबरी साधली आणि 3.5 गुणांसह संयुक्त आघाडी कायम ठेवली, तर सहाव्या फेरीत त्याचा सहकारी डी. गुकेशला मात्र फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजाविरुद्धच्या चुरशीच्या लढाईत पराभव पत्करावा लागला.
काळ्या सोंगाट्या घेऊन इंग्लिश ओपनिंगसह खेळताना प्रज्ञानंदला दुडाने सुऊवातीला वापरलेल्या काही युक्त्यांचा सामना करावा लागला. दुडा स्पर्धेत पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. परंतु भारतीय खेळाडू त्याच्या पोलिश प्रतिस्पर्ध्याला कोणताही वाव न देण्याच्या कामात पूर्णपणे यशस्वी झाला. खेळाच्या टप्प्यात प्रज्ञानंदला लगेच लक्षात आले की, त्याच्या संधी कमी आहेत. त्यामुळे बरोबरी हा एक योग्य निकाल होता, कारण कोणताही खेळाडू जास्त प्रगती करू शकला नाही.
मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात गुकेशला दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागून लाईव्ह रेटिंगमध्ये तो पाचव्या क्रमांकावर घसरला आहे आणि अर्जुन एरिगेईसीने जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले आहे. अलिरेझाने मधल्या खेळात संधी गमावल्यानंतर सामना अनिर्णित राहिला पाहिजे होता. तथापि, गुकेशने एक मोठी चूक केली आणि त्यातून सावरणे त्याला शक्य झाले नाही.
अलिरेझा, अमेरिकेचा फॅबियानो काऊआना, फ्रान्सचा मॅक्सिम वाचियर-लाग्राव्ह आणि प्रज्ञानंद यांनी संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. स्थानिक खेळाडू डीक बोगदान-डॅनियलविऊद्ध काऊआनाने विजय मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. वाचियर-लाग्राव्ह पांढऱ्या सोंगाट्यासह खेळताना फारशी चमक दाखवू शकला नाही आणि त्याने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हशी खूप लवकर बरोबरी साधली.









