वृत्तसंस्था/ बुचारेस्ट, रोमानिया
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने ग्रँड चेस टूरवरील सुपरबेट क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर आघाडीचे स्थान पटकावले. या फेरीत त्याने अमेरिकेच्या वेस्ली सो याचा पराभव केला.
काळ्या मोहरांनी खेळताना मिळविलेल्या या विजयानंतर प्रज्ञानंदचे एकूण 5 गुण झाले आहेत. विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशनेही पहिला विजय मिळविताना अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनवर मात केली. फ्रान्सचा मॅक्झिम वाशियर-लॅग्रेव्ह व अमेरिकेचा फॅबियानो कारुआना यांच्यातील डाव बरोबरीत राहिला तर स्थानिक जीएम डीक बोग्डन-डॅनियल व पोलंडचा डुडा जान क्रीस्तॉफ यांच्यातही बरोबरी झाली आहे. या स्पर्धेची अद्याप एक फेरी बाकी असून फ्रान्सचा अलीरेझा फिरोझा उझ्बेकच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हच्या आत्मविश्वासाला धक्का देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होता.
प्रज्ञानंद 5 गुणांसह आघाडीवर आहे तर कारुआना, वाशियर-लॅग्रेव्ह 4.5 गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. अलीरेझा फिरोझाने अब्दुसत्तोरोव्हवर विजय मिळविल्यास तो प्रज्ञानंदसह संयुक्त आघाडी मिळवू शकतो. दोन पराभवानंतर गुकेशला फॉर्म मिळाला असून तो 3.5 गुणांवर पोहोचला आहे.









