वृत्तसंस्था/ लॉसेन
आर. प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी आणि आर. वैशाली यांचा आगामी 2024 ‘फिडे वर्ल्ड रॅपिड व ब्लिट्झ चॅम्पियनशिप’मध्ये सहभागी होणाऱ्या पाच भारतीयांमध्ये समावेश असेल, असे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) स्पष्ट केले आहे. 26 ते 31 डिसेंबरदरम्यान न्यूयॉर्क शहरात ही प्रतिष्ठित स्पर्धा आयोजित केली जाईल. ही स्पर्धा प्रथमच उत्तर अमेरिकेत प्रवेश करत आहे.
कोनेरू हंपी आणि द्रोणवल्ली हरिका या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर भारतीय स्पर्धक आहेत. जगातील सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून आतापर्यंतची ही सर्वांत खडतर स्पर्धा ठरेल, असा दावा ‘फिडे’कडून करण्यात आला आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा यानेही स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला आहे, असे संघटनेने ’एक्स’वर स्पष्ट केले आहे.
‘फिडे’ने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, जगातील 300 हून अधिक सर्वोत्तम खेळाडू न्यूयॉर्क शहरात 1.5 दशलक्ष डॉलर्सच्या इनामांसाठी लढतील. भारतातील अव्वल खेळाडूंव्यतिरिक्त या स्पर्धेत झळकणार असलेल्या जगभरातील काही बड्या नावांमध्ये पाच वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन, फॅबियानो काऊआना, वेस्ली सो आणि लेव्हॉन अरोनियन यांचा समावेश आहे.
26 ते 28 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या रॅपिड चॅम्पियनशिपने या स्पर्धेची सुऊवात होईल. त्यानंतर 29 डिसेंबरला एक दिवस विश्रांती असेल. स्पर्धा 30 डिसेंबरला ब्लिट्झ चॅम्पियनशिपने पुन्हा सुरू होईल आणि 31 डिसेंबरला समारोप होईल.









