सांस्कृतिक प्रतिनिधी/फोंडा
प्रागतिक विचार मंच, गोवा संस्थेतर्फे गोवा क्रांतीदिनाचे औचित्य साधून गोवा मुक्ती लढयातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोविंद चिमुलकर यांचा शुक्रवार 17 जून रोजी सकाळी कवळे येथील त्याच्या निवासस्थानी सन्मान केला जाईल.
प्रागतिक विचार मंच या संस्थेतर्फे गेली चाळीस वर्षे गोवा क्रांतीदिन साजरा केला जात असून या दिवसाची आठवण म्हणून गोव्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केले जातो. गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक रोहिदास नाईक, पांडुरंग कुकळय़ेकर तसेच स्व. चंद्रकांत पेंकरे, स्व. पुरूषोत्तम शिरोडकर, स्व. श्रीधर वेरेकर, स्व.औदुबर शिंक्रे, स्व. नरसिंह पंचवाडकर अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकाना सन्मानित करून मुक्ती लढयातील त्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून क्रांतीदिन साजरा केलेला आहे.
सन्मान सोहळय़ाला संस्थेचे अध्यक्ष जयवंत आडपईकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, सुनिल सावकर, दुर्गाकुमार नावती, हेमंत खांडेपारकर, विनोद नाईक, राया बोरकर, माधुरी शेणवी उसगांवकर आदी मान्यवर उपस्थित असतील.









