ओटवणे /प्रतिनिधी-
अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या सन मराठी वाहिनीवरील सुंदरी या मालिकेत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोनशी गावचे सुपुत्र प्रफुल्ल गवस रिटायर्ड पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार आहे. टेल ए टेल मीडिया प्रा लिमिटेड या प्रॉडक्शनची ही सुंदरी मालिका आदित्य, अनु आणि सुंदरीच्या त्रिकोणी प्रेमातून पुढे सरकत आहे.
या मालिकेत पेशाने फोटोग्राफर असलेला आदित्य शहरात ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे काम करत असतो. त्यानंतर कामानिमित्त गावी आलेल्या आदित्यचे सुंदरी सोबत अपघाताने लग्न होते. परंतु आदित्यचे खरं प्रेम शहरातील अनुवर असते. सुंदरी पुढे शिक्षणासाठी शहरात येते आणि योगायोगाने अनुच्याच ऑफिसमध्ये नोकरी करते. आता दोघींनाही आपलं हे प्रकरण एकमेकीपासून लपवण्याची खरी कसरत आदित्य कशी करतो हे प्रत्यक्ष या मालिकेत पाहण्यासारखे आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कोनशी गावातील प्रफुल्ल गवस व्यवसायाने कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये झाले. या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेऊन त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. प्रफुल्ल गवस यांनी अभिनयाचे कोणतेही शिक्षण घेतले नाही. लहानपणी गावात होणाऱ्या दशावतार नाटकातून त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर केवळ आईचे मार्गदर्शन आणि स्व अनुभवातून त्यानी अभिनय कला आत्मसात केली.
उच्च शिक्षणासाठी कोल्हापूर येथे गेल्यानंतर कोल्हापूर केंद्राच्या अनेक राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट अभिनयाबद्दल अनेक पारितोषिके मिळविली. थेंब थेंब आभाळ, महाराज मेले, दूत येतो आणि सूर्य म्हणतो चांदणं दे अशा अनेक नाटकामधील त्यांच्या लाजवाब भूमिका रसिकांच्या मनात आजही घर करून आहेत.