अंधेरी कोठडीत रवानगी : डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर औषधपाणी
बेळगाव : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणातील आरोपी चित्रपट अभिनेता दर्शनचा साथीदार प्रदूषला गुरुवारी दुपारी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. कारागृह विभागाच्या सूचनेनुसार दर्शनसह या प्रकरणातील बहुतेक आरोपींना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात हलविण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कडक सुरक्षाव्यवस्थेत प्रदूषला बेळगावला आणण्यात आले. खळबळजनक खून प्रकरणातील आरोपी हिंडलगा कारागृहात आणणार म्हणून कारागृहाबाहेर माध्यम प्रतिनिधींनी गर्दी केली होती. प्रदूष कारागृहाबाहेर दाखल होताच प्रवेशद्वाराबाहेरच त्याची तपासणी करण्यात आली.
प्रदूषने आपल्यासोबत दोन बॅग आणल्या होत्या. केएसआयएसएफच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रदूषची झडती घेण्याबरोबरच त्याने आणलेल्या वस्तूंची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी त्याच्यासोबत ब्लँकेट व औषधे कारागृहात सोडण्यास नकार दिला. औषधांची गरज आहे, असे सांगितल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे दिली जातील, असे सांगितले. कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत सुरक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली असून, बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात दर्शनची बडदास्त ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईनंतर बेळगावात खबरदारी बाळगण्यात आली आहे. प्रदूषला अतिसुरक्षित अशा अंधेरी विभागात हलविण्यात आले आहे.









