प्रशासक मंजूलक्ष्मी अॅक्शन मोडवर, 48 तासात अहवाल सादर करा
कोल्हापूर : कसबा बावडा येथे ड्रेनेज पाईपलाईन न टाकताच ठेकेदाराला बिल अदा केले. याप्रकरणी प्रशाmanसक के. मंजूलक्ष्मी यांनी मंगळवारी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंटंट बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे यांना निलंबित केले. प्रशासक मंजूलक्ष्मी अॅक्शन मोडवर आल्या असून चौकशी समितीलाही 48 तासात अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यास काम पूर्ण करण्यापूर्वीच बिल अदा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली. यानंतर ठेकेदार वराळे याने कोणत्या अधिकाऱ्याला किती टक्केप्रमाणे पैसे दिले याची यादीच पत्रकाद्वारे सादर केली.
यानंतर हे प्रकरण गांभीर्याने घेत प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले. तर महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक – कलावती मिसाळ व वरिष्ठ लेखापरीक्षक सुनिल चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यास मान्यता दिली.
तसेच सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सेवानिवृत्त उपशहर अभियंता रमेश कांबळे व पवडी अकौंटंट सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिक प्रभाकर नाईक यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी संपूर्ण प्रकरणाची करण्यासाठी प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती केली आहे.
या चौकशी समितीला याचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यांनी मंगळवारी सायंकाळी चौकशी समितीला ४८ तासात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे अधिकारी, कर्मचारी कागदपत्रे व पुराव्याच्या आधारे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
खुलाशांच्या टिप्पणीचे काम सुरु
अधिकारी, कर्मचारी यांनी सोमवारी खुलासे सादर केले. यावर सात दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासक यांनी केल्या होत्या. मात्र मंगळवारी रात्री अचानक प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी ४८ तासात अहवाल सादर करण्याबाबत सूचना केल्या. त्यामुळे समितीला अहवाल तयार करण्याचे काम जलदगतीने करावे लागणार आहे.
फिर्यादी गायकवाड निलंबित
ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याच्या विरोधात महापालिका प्रशासनाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबतची फिर्याद कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनीच दिली आहे. मंगळवारी मंजूलक्ष्मी यांनी केलेल्या कारवाईमध्ये प्रज्ञा गायकवाड यांना निलंबित केले. त्यामुळे फिर्यादीच निलंबित झाल्याची चर्चा सुरु आहे.








