सांगली :
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ सुरु करण्याची घोषणा केली आहे. आवास प्लस सर्वेक्षणच्या प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले पंरतु सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबांना घरकुलाची संधी मिळणार आहे. आवास योजनेमध्ये ग्रामसेवकांमार्फत आणि स्वतः नोंदणी करण्यासाठी १८ जून शेवटची मुदत आहे. पात्र कुटुंबांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
केंद्र सरकारने पुढील पाच वर्ष सन २०२४-२५ ते २८-२९ या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यानुषंगाने सन २०१८ मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षण प्रतिक्षा यादी गृहीत आहे. या यादीत समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले पंरतु सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंबांचे सर्वेक्षण प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत नवीन एक्सक्लुसिव्ह क्रायटेरियानुसार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तीन-चार चाकी वाहन असणारे कुटूंब, तीन-चार चाकी कृषी उपकरण असणारे कुटुंब, ५० हजार किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहुन अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंब, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटुंबे, कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा १५ हजारापेक्षा जास्त कमवत असलेले कुटुंबे, आयकर, व्यावसायिक कर भरणारे कुटुंबे, याशिवाय अडीच एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंबे, पाच एकर पेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे पात्र कुटुंबाचे सुधारीत एक्सक्लुसिव्ह क्रायटेरियानुसार सुधारीत आवास प्लस मोबाईल अॅपमध्ये सर्वेक्षकाची नोंदणी करण्यात येत असल्याचे ग्रामीण विकासच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी सांगितले.
- मोबाईलवरच सर्वेक्षण करा
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर सर्वेक्षण करू शकता. त्यासाठी तुम्हाला अॅप डाउनलोड करावं लागेल. सर्वेक्षण करताना तुमच्याकडे आधार कार्ड आणि आधार क्रमांक आवश्यक आहे. अॅपमध्ये चेहरा ओळखून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते.








