जनतेचे मानले आभार, सरकारचे केले अभिनंदन : लोकसभा निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा निर्धार,प्रथमच राज्य कार्यकारीणी बैठक पणजीबाहेर,गोव्यात होणाऱ्या जी 20 परिषदेबाबत मार्गशर्दन,म्हादईसह अन्य विषयांवर गांभीर्यपूर्वक चर्चा
प्रतिनिधी /वास्को
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपाचे सरकार पुन्हा स्थानापन्न करण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दक्षिण व उत्तर गोवा असे दोन्ही मतदारसंघ जिंकण्याचा संकल्प गोवा प्रदेश भाजपा राज्य कार्यकारीणीने केला आहे. तसेच कोणत्याही आव्हानांचा सामना करीत म्हादईची लढाई जिंकण्याचाही निर्धार भाजपा राज्य कार्यकारीणीने केला आहे.
काल रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वास्कोतील हॉटेल एच. क्यू. येथे गोवा प्रदेश भाजपा राज्यकारणीची बैठक पार पडली. बैठकीला भाजपाचे केंद्रीय नेते व केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह गोव्याचे विश्वजित राणे व बाबूश मोन्सेरात वगळता इतर सर्व मंत्री बैठकीला उपस्थित होते. खासदार विनय तेंडुलकर तसेच माजी खासदार नरेंद्र सावईकर बैठकीला उपस्थित होते. गोवा प्रदेश कार्यकारीणीचे 146 पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथमच कार्यकारीणी बैठक पणजीबाहेर
सकाळी 10 वा. केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संध्याकाळी 5 वा. पर्यंत या बैठकीची सांगता झाली. एरवी दरवेळी पणजी शहरात घेण्यात येणारी प्रदेश कार्यकारणीची बैठक यंदा प्रथमच पणजीबाहेर वास्को शहरात घेण्यात आली.
जनतेचे आभार, सरकारचे अभिनंदन
गोव्यातील जनतेने मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्तेवर स्थानापन्न केल्याबद्दल आणि पंचायत निवडणुकीतही जनतेने यशस्वी केल्याबद्दल बैठकीत आभार मानण्यात आले. गोवा राज्य सरकारच्या कामगीरीबाबत समाधान व्यक्त करून सरकारचेही अभिनंद करण्यात आले. या बैठकीत गोव्यातील विविध समस्यांवर चर्चा झाली. सामान्य जनतेच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. विविध राजकीय ठरावही या बैठकीत संमत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवीन झुआरी पुल अशा विविध विकास प्रकल्पांवर चर्चा होऊन सरकारचे अभिनंदन करण्यात आले.
म्हादईसह अन्य विषयांवर गांभीर्यपूर्वक चर्चा
सरकारने जल वितरण, खाण उद्योग, म्हादईच्या प्रश्नावर उचललेली पावले याविषयांवर गांभिर्याने चर्चा होऊन समाधान व्यक्त करण्यात आले. सरकारने शिक्षण, क्रीडा व इतर क्षेत्रात केलेल्या कामगीरीबाबतही समाधान व्यक्त करण्यात आले. सरकारच्या विविध समाजोपयोगी योजनांबाबत व त्यांच्या यशस्वी कार्यवाहीबाबत बैठकीत चर्चा झाली.
गोव्यात होणाऱ्या जी 20 समिटबाबत मार्गशर्दन
येत्या 27 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पे चर्चा या देशव्यापी कार्यक्रमाबाबतही चर्चा व मागदर्शन झाले. शिवाय पक्षाच्या विविध कार्यक्रमांविषयी या बैठकीत माहिती देण्यात आली. देशात होणाऱ्या जी 20 समिट अंतर्गंत 200 बैठकांपैकी येत्या एप्रिल ते जुलै दरम्यान गोव्यात 8 बैठका होणार आहेत. त्याचे गोव्याला पर्यटनदृष्ट्या होणारे लाभ या विषयी माहिती देण्यात आली. सरकारचे विकास कार्य तसेच विविध योजनांची यशस्वी कार्यवाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत झालेली चर्चा, घेण्यात आलेले निर्णय व ठराव या विषयी सविस्तर माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच मंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांना दिली. यावेळी आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, उपस्थित होते.
महादईचा लढा जिंकण्याचा निर्धार
बैठकीत म्हादईच्या प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा झाली. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असल्याने म्हादईप्रश्नी कर्नाटकविरूध्दची लढाई सर्व आव्हानांचा सामना करीत ज्ंिांकण्याचा निर्धार कार्यकारीणीने केला. देशातील आणि राज्यातील सरकारचे कार्य गावोगावी पोहोचवून सरकारप्रती वातावरण निर्मिती करण्याचा आणि येत्या लोकासभा निवडणुकीत गोव्याचे दोन्ही मतदारसंघ जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.









