विविध ठिकाणांहून काँग्रेसला वाढता पाठिंबा
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी मतदारसंघात जोरदार प्रचाराची मोहीम हाती घेतली. रविवारी महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, कपिलेश्वर मंदिर, हुंचेनट्टी भागात प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठी-भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या. काँग्रेसचे मत म्हणजे विकासाला मत, हे लक्षात घेऊन भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती प्रभावती मास्तमर्डी यांनी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवून निवडून देण्याचा निर्धार केला. सध्या विविध भागात प्रचारमोहीम राबविण्यात येत असून महाद्वार रोड, क्रॉस नं. 1 ते 5, कपिलेश्वर कॉलनी, कपिलेश्वर मंदिर परिसर, त्याचप्रमाणे हुंचेनट्टी परिसरातील मतदारांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याची प्रभावती मास्तमर्डी यांनी ग्वाही दिली. यावेळी प्रभावती मास्तमर्डी यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. मतदारांनी त्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. स्थानिकांनी अनेक कष्ट सहन केले. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, स्वच्छतेचा अभाव, योग्य रस्त्यांचा अभाव याबाबत मत मांडले. काँग्रेस पक्षाची सत्ता राज्यात आली तर मतदार संघाचा विकास शक्य असल्याचे सांगितले. त्याशिवाय काँग्रेसच्या पाच गॅरंटींची माहिती दिली, जेणेकरून लोकहितांचे प्रकल्प राबविता येतील. काँग्रेसच्या ध्येय-धोरणांची माहिती देऊन निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतांनी विजयी करणे ही काळाची गरज आहे. वाढती महागाई त्याचप्रमाणे नवनवीन अडचणी नागरिकांना भेडसावत आहेत. या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. केवळ स्मार्ट सिटी बनवून विकास होत नसून नागरिकांच्या समस्या पाहणे गरजेचे आहे. हे काम सध्याच्या सरकारने केले नसल्याचे प्रभावती मास्तमर्डी यांनी सांगितले.









