कोल्हापूर/सौरभ मुजुमदार
कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मुख्य गर्भगृहात दगडी चबुतऱ्यावर उभी असणारी मूर्ती म्हणजेच साक्षात एक तेज:पूंज आद्य शक्तिस्थान होय. याच जगदंबेच्या मूर्तीतून जणू काही तेजाचे वलय बाहेर पडत असते, त्यास ‘प्रभावलय’ म्हणतात. कदाचित याचे प्रतीक म्हणूनच करवीर निवासिनीच्या मागे असणारी सुंदर कलाकृती म्हणजेच तिची ‘प्रभावळ’ होय.
जगदंबेची मूर्ती ही गर्भगृहात लाकडी मेघडंबरीमध्ये विराजमान आहे. जिच्या पाठीमागे पूर्वी पितळी धातूची प्रभावळ व या प्रभावळीमागे कदाचित याच मेघडंबरीचा भाग असणारा लाकडाचा चौरसासम भाग होता. दोन्ही बाजूला दोन पितळी हत्तींच्या मूर्तीवर ही जुनी प्रभावळ उभी होती.
सध्या असणारी श्री करवीर निवासिनीची प्रभावळ खूपच सुंदर व आकर्षक आहे. यावर प्रामुख्याने दोन्ही बाजूला सिंहाप्रमाणे असणारे दोन प्राणी असून त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या अग्नीची पूर्णकडी या प्रभावळीवर असून देवीच्या मूर्तीतून जे तेज बाहेर पडते तेच तेज जणू हे प्राशन करीत आहेत, असा भास होतो. दोन्ही बाजूला गऊड व हनुमंत असणारे दोन ध्वज, तर सूर्य व चंद्र असणाऱ्या दोन पताका वरील बाजूस आहेत. मध्यभागी सर्वात वरील बाजूस किर्तीमुख असून त्यावर छत्र आहे. एका बाजूला शंख, तर दुसऱ्या बाजूला चक्र आहे. दोन्ही बाजूला हत्ती आहेत. खालील बाजूस दोन्हीकडे चवरीधारी सेवकांच्या स्मितहास्य करणाऱ्या मूर्ती आहेत. ज्या मंदिराच्या पितळी उंबऱ्यातून प्रवेश करताना दोन्ही बाजूला असणाऱ्या भव्य जय-विजय यांच्या पाषाणमूर्ती प्रमाणे भासतात.नवरात्रौत्सवात आपण देवीच्या माहितीचा, इतिहासाचा, तिच्या नवरूपांचा, सुवर्णालंकार पूजांचा, व मंदिरातील नित्यक्रमाचा अभ्यास करतो. त्याचप्रमाणे साक्षात देवीच्या तेजाच्या वलयांचे प्रतीक असणारी ही देवी जवळच मुख्य गर्भगृहातील प्रभावळीची माहिती तिच्या भक्तांसाठी आवश्यकच आहे.
प्रभावळ हे एक महत्त्वाचे राजचिन्ह असून विशेषत: करवीर निवासिनी अंबाबाईबाबत ते तिच्या गाभाऱ्याचे सौंदर्य वाढवते. छत्र पताका त्यावर गरूड, हनुमंत, सूर्य, चंद्र यांच्या अब्दागिरी शंख, चक्र या दैवी संपदा आणि सर्वात महत्त्वाचे किर्तीमुख या सगळ्यामुळे देवीचे सामर्थ्य व्यक्त होते.
ॲड. प्रसन्न मालेकर,
मंदिर व मूर्तीशास्त्र अभ्यासक,
ज्येष्ठ चित्रकार कै. कृ. दा. राऊत यांचे मोलाचे योगदान
नवरात्रौत्सवात सदरची प्रभावळ स्वच्छतेसाठी काही मोजकेच तीन-चार दिवस काढून ठेवतात. त्यावेळी त्याच्या पाठीमागे दडलेली एक सुंदर भिंतीवर देवीच्या दोन्ही बाजूस असणारी कलाकृती उजेडात येते. जी कलाकृतीही चित्रकार कै. कृ. दा. राऊत यांनी या भिंतीमध्ये खाचकाम करून मोठ्या कौशल्याने साधारणत: इ. स. 1940 ते 1945 च्या दरम्यान करण्यात आलेली होती, असे समजते.
भक्तीचे व बंधुत्वाची प्रतीक असणारी जगदंबेची प्रभावळ
प्रभावळीच्या या कामाचे वैशिष्ट्या म्हणजे टेंडर पद्धतीने निघालेल्या या कामाच्या पूर्ततेमध्येही कोल्हापूरची बंधुत्वाची , एकतेची व जगदंबेच्या भक्तीची एक अनोखी झालर व चकाकी आजही टिकून आहे. शांती कामात आव्हानात्मक काम स्वीकारणारे कलाकार बाळकृष्ण गणेश बुधले. यांनी स्वत? हे काम स्वीकारूनही आपल्या बरोबरीने समव्यवसायिकांना कारागिरांना या कामासाठी सोबत घेतले. ज्यामध्ये प्रामुख्याने बाबुराव चव्हाण, शंकराव चव्हाण (सातारकर) व गुलाबसाहेब जमादार तसेच चित्रकार कै.कृ.दा.राऊत यांच्या सोबतीने हे काम देवीचरणी भक्ती भावाने पूर्ण केले.नवरात्र उत्सवात सदरची प्रभावळ स्वच्छतेसाठी काही मोजकेच तीन चार दिवस काढून ठेवली जाते त्यावेळी मूर्तीच्या पाठीमागे भिंतीवर दडलेली दोन्ही बाजूस एक सुंदर कलाकृती उजेडात येते. जी कलाकृती चित्रकार कै. कृ.दा.राऊत यांनी या भिंतीमध्ये खाचकाम करून मोठ्या कौशल्याने साधारणत? इ.स.1940 ते इ.स.1945 च्या दरम्यान करण्यात आलेली होती असे समजते.हे चित्रकार कै. राऊत म्हणजे शिवशाहीर राजू राऊत यांचे वडील होय.









