अखंड बारा वर्षांपासून शहापूर भागात फेरी
बेळगाव : शहापूर येथील माहेश्वरी व इतर समाज भक्तजन यांच्याकडून दररोज काढण्यात येणाऱ्या प्रभातफेरी सत्संगाला बारा वर्षे पूर्ण होऊन तेराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. अखंड सुरू असलेल्या या सत्संगाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभातफेरी सत्संग परिवारतर्फे करण्यात आले आहे. शहापूर येथील बालाजी मंदिर येथून दररोज सकाळी 6.20 वा. फेरीला सुरुवात होते. 2011 पासून सदर फेरी अखंड सुरू असून चार विभागांनुसार शहापूर येथील गल्ल्यांमध्ये काढण्यात येते. महिन्यातील पहिल्या आठवड्यात बालाजी मंदिर ते एस. पी. एम. रोडमार्गे, कपिलेश्वर मंदिर येथून पुन्हा मंदिराकडे, दुसऱ्या आठवड्यात बालाजी मंदिर ते नार्वेकर गल्ली, जोशी मळा, आचार्य गल्ली, शहापूर येथून पुन्हा मंदिराकडे, तिसऱ्या आठवड्यात बालाजी मंदिर ते बिच्चू गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, नाथ पै चौक येथून पुन्हा मंदिराकडे आणि चौथ्या आठवड्यात बालाजी मंदिर ते दाणे गल्ली, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, होसूरपर्यंत जाऊन पुन्हा मंदिराकडे येते. अशाप्रकारे दररोज देवाच्या नामस्मरणाबरोबरच आरोग्यासाठीही प्रभातफेरी उत्तम आहे. या प्रभातफेरीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









