वृत्तसंस्था/ हुबळी
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या इलाईट अ गटातील सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी प्रभसिमरन सिंगच्या शानदार शतकामुळे पंजाबने यजमान कर्नाटक विरुद्ध दुसऱ्या डावात 3 बाद 238 धावा जमविल्या होत्या.
या सामन्यात प्रभसिमरन सिंगने 17 चौकारांसह 146 चेंडूत 100 धावा जमविल्या. तर त्याला अभिषेक शर्माकडून चांगली साथ मिळाली. अभिषेक शर्माने 123 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 91 धावा जमविताना प्रभसिमरन सिंग समवेत 192 धावांची भागिदारी केली. या सामन्यात कर्नाटकाने आपला पहिला डाव 6 बाद 461 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी 8 बाद 514 धावांवर डावाची घोषणा केली. पंजाबचा पहिला डाव 152 धावात आटोपल्याने कर्नाटकाने पंजाबवर पहिल्या डावात 362 धावांची भक्कम आघाडी मिळविली होती. पण पंजाबने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. पंजाबचा संघ अद्याप 124 धावांनी पिछाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक – पंजाब प. डाव सर्व बाद 152, कर्नाटक प. डाव 8 बाद 514 डाव घोषित (देवदत्त पडिकल 193, मनिष पांडे 118, एस. शरथ 76, अर्शदीप सिंग 3-92), पंजाब दु. डाव 3 बाद 238 (प्रभसिमरन सिंग 100, अभिषेक शर्मा 91).









