प्रतिनिधी /म्हापसा
पोंबुर्फा एकोशी हे एक कलाकारांचे गाव. या गावातून अनेक कलाकारांनी आपले व आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. उदा. प्रल्हाद हडफडकर, वामन भोसले, डॉ. भोबे आफ्रेड रोझ, जो रोझ इत्यादी असे अनेक कलाकार या गावातून निर्माण झाले. तसेच एक कलाकार आपल्या वयाची 92 वर्षे पूर्ण करून माती पासून गणपतीच्या मूर्ती बनवित आहे.
प्रभाकर शे” शिरोडकर (92) हे मूळ पोंबुर्फा वेलोटी येथील एक नागरिक. गेली 77 वर्षापासून अनेक प्रकारच्या गणपतीच्या मातीपासून मूर्ती बनवित आहे. वयाचे 12 वर्षाचे असताना ते आपल्या वडिलांबरोबर गणपती कसे करतात ते पाहण्यासाठी बिठ्ठोण येथील बाबुसो शिरोडकर यांच्या घरी जायचे व त्यांच्याकडून माती घेऊन येऊन आपल्या घरी गणपती करीत असे. हळूहळू त्यांना ते जमू लागले. नंतर त्यांनी आपल्या घरी गणपती करण्यास सुरुवात केली व काही शेजारी त्यांच्याकडून गणपती नेऊ लागले. हळूहळू त्यांनी त्यात लक्ष केंद्रीत केले व आपला व्यवसाय वाढविला. थिवी माडेल येथून कवठणकर यांच्याकडून माती आणून गणपती, सरस्वती, लक्ष्मी व इतर मूर्ती करू लागले. आपल्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी पोंबुर्फा येथे असलेल्या डॉ. भोबे यांच्या घरातून केली. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. या व्यावसायात त्यांना त्यांच्या मुलांची व पुतण्याची खूप साथ मिळाली.
गेली 65 वर्षे ते वास्को येथे अनिल चोडणकर यांच्या घरी गणपती करून विकतात. एवढेच नव्हे तर वास्को सप्ताहासाठी ते पार (देवतांच्या मूर्ती) करतात.
गणपतीच्या मूर्ती करण्यास त्यांना सरकारचे मानधन मिळते परंतु आताच्या महागाईपुढे ते मानधन कमी पडते. त्यांनी सरकारकडे मिळणाऱया मानधनात वाढ करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. प्रभाकर हे सध्या 92 वर्षाचे असल्याने आरोग्य त्यांना चांगली साथ देत नाही. तरीसुद्धा ते मागार घेत नाही. आपला व्यवसाय चालूच ठेवतात.









