वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हॉकी संघातील भक्कम गोलरक्षक तसेच भारतीय हॉकी क्षेत्राची अभेद्य भिंत म्हणून ओळखला जाणारा पीआर श्रीजेश याची भारतीय कनिष्ठ हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर श्रीजेशने आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रातून निवृत्ती पत्करली.
हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून गोलरक्षक श्रीजेशला एक अनोखी भेट दिली. या स्पर्धेमध्ये पीआर श्रीजेशचे गोलरक्षण भक्कम झाल्याने भारतीय संघाला गुरुवारी झालेल्या कांस्यपदकासाठीच्या सामन्यात स्पेनला पराभूत करता आले. या सामन्यामध्ये श्रीजेशने स्पेनच्या अनेक चढाया रोखल्या. तर पेनल्टी कॉर्नरवरील त्यांचे फटके फोल ठरविले. 36 वर्षीय श्रीजेशने आपल्या 18 वर्षांच्या हॉकी कारकिर्दीला निरोप दिला. श्रीजेशच्या हॉकी कारकिर्दीत भारतीय हॉकी संघाने 2021 च्या टोकियो तर 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन कांस्यपदके मिळविण्याचा पराक्रम केला. येत्या काही दिवसांमध्ये हॉकी इंडियातर्फे श्रीजेशच्या प्रमुख प्रशिक्षक पदाची घोषणा केली जाणार आहे. हॉकी इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पीआर श्रीजेशबरोबर चर्चा केली असून त्याने या प्रस्तावाला होकार कळविला असल्याचे हॉकी इंडियाचे प्रमुख दिलीप तिरकी यांनी सांगितले. भारतीय वरिष्ठ हॉकी संघातून श्रीजेशने निवृत्ती पत्करल्यानंतर आता कृष्णन बहाद्दुर पाठक आणि सुरज करकेरा यांच्यावर गोलरक्षणाची जबाबदारी राहिल. पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाला श्रीजेशचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीबाबत दिलीप तिरकीने समाधान व्यक्त केले. या स्पर्धेत सांघिक कामगिरीमुळेच भारतीय हॉकी संघाला हे यश मिळविता आले, असेही कर्णधार हरमनप्रित सिंगने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे शनिवारी मायदेशी आगमन झाले.









