काँग्रेसचे 85 वे अधिवेशन ः राहुल-सोनिया गांधींची उपस्थिती ः ‘सीडब्ल्यूसी’ची निवडणूक न घेण्याचा निर्णय
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगडमधील रायपूर येथे शुक्रवारपासून काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सुकाणू समितीच्या बैठकीत पक्षाच्या कार्यकारिणी समिती (सीडब्ल्यूसी) निवडणुका न घेण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सदस्य नामनिर्देशित किंवा नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आणखी दोन दिवस हे अधिवेशन चालणार असून पहिल्या दिवशी विषय समितीची बैठकही पार पडली. तसेच काँग्रेस पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीवरही अधिवेशनात चर्चा होणार आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी देशभरातील काँग्रेस नेते छत्तीसगडमध्ये पोहोचले आहेत. या अधिवेशनात राहुल गांधी आणि सोनिया गांधीही सामील झाले आहेत. शुक्रवारपासून रायपूरमध्ये सुरू झालेले ही अधिवेशन तीन दिवस चालणार आहे. या तीन दिवसांच्या अधिवेशनात आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय संबंध, कृषी, रोजगार यासह विविध मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे. तसेच यावर्षी देशातील काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या संदर्भात अधिवेशनात काही चर्चा होणार का? या निवडणुकांमध्ये काँग्रेसची रणनिती काय असणार यावरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्मयता आहे. तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर देखील या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्मयता आहे.
काँग्रेसचे संपर्कप्रमुख जयराम रमेश यांनी सुकाणू समितीची बैठक झाल्याचे सांगितले. या बैठकीत सर्व सदस्यांनी आपापली मते मांडली. काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. आमच्या पक्षाच्या घटनेत एक अतिशय महत्त्वाची दुरुस्ती प्रस्तावित असून त्याचाही विचार केला जाईल, असे ते म्हणाले. सुकाणू समितीच्या बैठकीत शुक्रवारी कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला, तरुण आणि अल्पसंख्याक समुदायांचे प्रतिनिधित्व सुरक्षित आणि सुनिश्चित करण्यासाठी तरतूद केली जाईल, अशी माहिती जयराम रमेश यांनी बैठकीअंती दिली. कार्यकारिणीची निवडणूक घेण्यासाठी किंवा सीडब्ल्यूसीच्या सदस्यांना नामनिर्देशित करण्यासाठी अध्यक्षांना अधिकार देण्याचीही काँग्रेस घटनेत तरतूद आहे. निवडणूक झाल्यास सीडब्ल्यूसीच्या एकूण 25 सदस्यांपैकी 12 सदस्य निवडले जातात आणि 11 सदस्यांना पक्षाध्यक्ष नामनिर्देशित करतात. काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस संसदीय पक्षाचा नेता आपोआप सीडब्ल्यूसीचा सदस्य असतो.
‘बेळगाव’मधील अधिवेशनाला खर्गेंनी दिला उजाळा
पहिल्याच दिवशी सुकाणू समितीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची तुलना महात्मा गांधींशी करताना दिसले. 1885 पासून आतापर्यंत काँग्रेसच्या 138 वर्षांच्या इतिहासात 84 अधिवेशने झाली. परंतु हे अधिवेशन या अर्थाने विशेष आहे की सुमारे 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1924 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. हे अधिवेशन आपले गृहराज्य असलेल्या कर्नाटकातील बेळगाव येथे झाल्याचे खर्गे यांनी नमूद केले. गांधीजी केवळ एकदाच काँग्रेसचे अध्यक्ष होते. पण अल्पावधीतच त्यांनी काँग्रेसला गरीब, दुर्बल घटक, खेडय़ापाडय़ात आणि तरुणांशी जोडून चळवळ बनवली. 100 वर्षांनंतर पुन्हा त्याच निश्चयाची आणि कर्तव्याची गरज आहे. हीच त्यांना सर्वात मोठी श्रद्धांजली असेल, असेही खर्गे पुढे म्हणाले.
‘मिशन 2024’चे आव्हान
जवळपास दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हे अधिवेशन होत आहे. आमच्यासमोर हे एक मोठे आव्हान आहे तसेच एक मोठी संधी आहे. अनेक गंभीर आव्हाने या देशासमोर असताना हे अधिवेशन होत आहे. लोकशाही आणि संविधान धोक्मयात आले आहे. संसदीय संस्थांनाही गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. राजकीय घडामोडींवरही लक्ष ठेवले जात आहे. या संदर्भात आपण अतिशय काळजीपूर्वक विचार करून भविष्यकाळात जनतेपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पक्षाध्यक्ष खर्गे यांनी केले आहे. याप्रसंगी त्यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतून निर्माण झालेल्या जागृतीचाही प्रामुख्याने उल्लेख केला.
सोनियांचे आज तर राहुल गांधींचे उद्या संबोधन
शुक्रवारी सकाळपासून अनिश्चिततेचे वृत्त आल्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी दुपारी तीनच्या सुमारास विशेष विमानाने रायपूरला पोहोचले. सोनिया गांधी आज म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. तर राहुल गांधी रविवार, 26 फेब्रुवारीला पहिल्या सत्रात अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. शुक्रवारी त्यांचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, विधानसभा अध्यक्ष डॉ. चरणदास महंत, एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मोहन मरकाम आणि अन्य नेत्यांनी विमानतळावर स्वागत केले. याप्रसंगी विमानतळाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ‘छत्तीसगढी’ शैलीत स्वागत करण्यासाठी अनेक नृत्य पथकांना येथे बोलावण्यात आले होते. सोनिया आणि राहुल येथे पोहोचताच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.









