वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रेल्वे अपघातात डावा पाय गमविल्यानंतरही जिद्दीने खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या दिनेश बागडेने सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. 46 वर्षीय विक्रमसिंह अधिकारीने पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. नेमबाजीत महाराष्ट्राला तिसरे स्थान प्राप्त केले आहे. अॅथलेटिक्स पाठोपाठ पॉवरलिफ्टिंगमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. स्पर्धेत 2 सुवर्ण 2 रौप्य व 1 कांस्य अशी एकूण 5 पदके महाराष्ट्राने पटकावले. गत स्पर्धेत 2 रौप्य व 2 कांस्य अशी महाराष्ट्राची कामगिरी होती.
जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरातील सभागृहात संपलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत जळगावच्या दिनेश बागडेने महाराष्ट्रासाठी शेवटचे पदक जिंकून सुवर्णसांगता केली. 107 किलो गटात गुजरात, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या स्पर्धेकांनी मागे टाकून दिनेश बाजी मारली. पहिल्या फेरीपासून दिनेश आघाडीवर राहिला. तिसऱ्या फेरीत सर्वाधिक 157 किलो वजन पेलून त्याने सोनेरी कामगिरीची नोंद केली. 149 किलो वजन उचलून गुजरातच्या दिव्येश लडानीने रौप्य, दिल्लीच्या जोगिंदरसिंगने कांस्य पदकाची कमाई केली.
पॅरालिम्पिकपटू असणाऱ्या मुंबईच्या विक्रमसिंह अधिकारीने पॉवरलिफ्टिंगमध्ये 72 किलो गटात कांस्य पदक पटकावले. 162 किलो वजन पेलत विक्रमने वयाच्या 46 व्या वर्षी पदक जिंकण्याची करिश्मा घडविला आहे. पोलियोमुळे दोन्ही पायाने अधू असणाऱ्या विक्रमसिंहचे हे खेलो इंडिया स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.
नेमबाजीत महाराष्ट्राला तिसरे स्थान
नेमबाजीत महाराष्ट्राने 2 सुवर्ण व 1 रौप्य पदक जिंकून तिसरे स्थान प्राप्त केले. महाराष्ट्रासाठी स्वरूप उन्हाळकर व सागर कटाळेने सुवर्णपदके जिंकली. सर्वसाधारण तृतीय विजेतेपदकाचा करंडक स्वरुप उन्हाळकरासह प्रशिक्षिका नेहा साप्ते, व्यवस्थापक विक्रम शिंदे यांनी स्वीकारला. नेमबाजीत राजस्थानने सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले आहे









