हेस्कॉम प्रशासनाचा नागरिकांकडून निषेध
बेळगाव : एकीकडे विद्युत विभागाकडून भारनियमन होणार नाही, असे आश्वासन दिले जात असताना दुसरीकडे मात्र शहरातील उपनगरांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. रविवारी रात्री अनगोळ परिसरात विद्युत बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तो थेट सोमवारी सकाळीच सुरळीत झाल्याने संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारात काढावी लागली. यामुळे हेस्कॉम प्रशासनाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. रात्री 9 च्या सुमारास अनगोळ परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला. काही वेळात वीजपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, रात्री उशिरापयर्तिं वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. वाढता उष्मा आणि डासांचा उपद्रव यामुळे झोप नसताना नागरिकांना जागरण करावी लागली.. अनेकवेळा फोन करूनदेखील कर्मचाऱ्यांकडून योग्य उत्तरे दिली जात नसल्याने नाराजीचा सूर उमटत होता.
फोन काढून बाजूला ठेवण्याचा प्रकार
हेस्कॉमने तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन दिल्या आहेत. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांकही ग्राहकांना दिले आहेत. परंतु, रविवारी रात्री बिघाड झाल्यानंतर कार्यालयात फोन केला असता त्याला योग्य उत्तरे देण्यात आली नाहीत. काही वेळाने तर फोन काढून बाजूला ठेवण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागला.








