ऐन पावसाळ्यात नागरिकांना करावा लागतोय अंधाराचा सामना : शेतकऱ्यांसह विद्यार्थीवर्गाचे हाल
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील किणये परिसरात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. या भागात सुरळीत वीजपुरवठा केला जात नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिक अक्षरश: वैतागून गेलेले आहेत. हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकवेळा सांगूनही सुरळीत वीजपुरवठ्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. या परिसरातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. किणये भागात गेल्या तीन महिन्यांपासून सुरळीत वीजपुरवठा केला जात नाही. गावातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी याचा ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विद्युत पुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अवघड होऊ लागले आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही. त्यामुळे विद्यार्थीवर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी माहिती पालकांनी दिली आहे.
यापूर्वी कितीतरी मुसळधार पाऊस पडत होता. अशा परिस्थितीतही वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवण्यात येत होता. मात्र अलीकडे वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत विचारणा केल्यास इकडे काम सुरू आहे. तिकडे काम सुरू आहे, असे सांगून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे, अशी माहिती रामलिंग गुरव यांनी दिली. या भागात 24 तास वीज पुरवठा ही योजना तीन वर्षांपूर्वीच सुरू केली आहे. सरकारकडून 24 तास वीज पुरवठा या भागात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तशी घोषणाही झाली. त्या पद्धतीची विद्युत तारांची जोडणी, विद्युत खांबांची उभारणीही झालेली आहे. मात्र इथली जनता अद्यापही 24 तास विद्युत पुरवठ्यापासून वंचित आहे. याचा हेस्कॉम अधिकाऱ्यांनी विचार करावा. या भागातील 24 तास वीजपुरवठा देण्यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे यशवंत गुरव यांनी सांगितले. खंडित वीज पुरवठ्यामुळे किणये पंचक्रोशीतील नागरिक वैतागून गेलेत. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन भागात सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
वीजपुरवठा सुरळीत न केल्यास मोर्चा काढू !
मागील तीन महिन्यापासून या भागात विद्युत पुरवठा सुरळीत नाही. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन केला असता या भागात विद्युत तारा कट झाल्या आहेत. त्या भागात कामकाज सुरू आहे, अशी पूर्वीची उत्तरे देण्यात येत आहेत. शेत शिवारातील विद्युत पुरवठाही सुरळीत नाही. दुरुस्तीच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ लागला आहे. काही शेतकऱ्यांची घरे शेतशिवारात आहेत. रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा नसल्यामुळे शिवारातील शेतकऱ्यांच्या मुलांनी अंधारात अभ्यास करायचा कसा? वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढू.
-सुरेश डुकरे, किणये










