वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
विजेच्या बाबतीत देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्याची स्थिती खूप चांगली आहे. तीव्र लोडशेडिंग होत असलेल्या आंध्र प्रदेश सारख्या राज्यात दिवसाचे पाच तास सुद्धा उद्योगधंदे सुरू ठेवता येत नाहीत. त्यामुळे आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
विस्तारित मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना मंगळवारी खातेवाटप करण्यात आले होते. त्यात श्री. ढवळीकर यांना वीज, नवीन आणि अक्षय उर्जा तसेच गृहनिर्माण ही खाती प्राप्त झाली आहेत. या खात्यांचा ताबा घेतल्यानंतर श्री. ढवळीकर यांनी बुधवारी पणजीतील वीज मुख्यालयास भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती व आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोरोना महामारीच्या संकटामुळे चीनमध्ये झालेले लॉकडाऊन, रशिया व युपेन या देशांदरम्यान चाललेले युद्ध, यासारख्या विविध जागतिक कारणांमुळे गोव्याच्या वीज पुरवठय़ावर परिणाम होऊ शकतो, असे श्री. ढवळीकर पुढे म्हणाले.
त्यामानाने गोवा आजही विजेच्या बाबतीत भाग्यवान आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यातील विजेची स्थिती चांगली आहे. कोळशाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे वीज उत्पादनात अडचणी येतात. आंध्र प्रदेशात तीव्र लोडशेडिंग करण्यात येते. त्यामुळे तेथील उद्योगधंदे धड पाच तास सुद्धा सुरू राहू शकत नाहीत. रशिया-युपेन युद्धामुळे कोळशाचा तुटवडा आहे, असे त्यांनी सांगितले.
चीनचा विचार केल्यास सर्वाधिक लोकसंख्येचा हा देश सध्या लॉकडाऊनमधून जात आहे. वीज वहनासाठी लागणारी कंडक्टर्स आदी सामुग्री चीनमधून येते. सध्या शांघाय एका महिन्यासाठी लॉकडाऊन आहे. त्याही परिस्थितीत गोव्यात विजेची स्थिती चांगली आहे, असे ढवळीकर म्हणाले.
मे महिन्याच्या सुट्टीत गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली तरच लोडशेडिंगची गरज भासणार आहे. अन्यथा तशी परिस्थिती उद्भवणार नाही. गोव्यात लोडशेडिंग करावेच लागले तर ते पर्यटन उद्योगामुळे असेल. त्यासंदर्भात 15 मे पर्यंत अंदाज येईल. पर्यटकांची संख्या वाढली तरच लोडशेडिंगची वेळ येईल. पर्यटक कमी असतील तर अडचण येणार नाही, असे वीजमंत्र्यांनी सांगितले.









