अघोषित भारनियमन : आगामी काळात समस्या तीव्र होण्याची चिन्हे
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात तीव्र दुष्काळ असताना आता विजेची टंचाई निर्माण झाली आहे. येत्या काळात ही समस्या आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. वीज टंचाईमुळे राज्यात सध्या अघोषित भारनियमन जारी आहे. राज्यात सध्या 16,000 मेगावॅट वीज मागणी आहे. मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण 12,000 मे. वॅट इतके होते. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने परराज्यातून वीज खरेदीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
पावसाअभावी राज्यातील आलमट्टी वगळता इतर कोणतीही जलाशये भरलेली नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम जलविद्युत निर्मितीवर झाला आहे. त्यामुळे राज्यात विजेची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपसेटसाठी थ्रीफेज वीज उपलब्ध होणे अशक्य झाले आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरातही विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. ऑक्टोबर सुरू झाल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून विजेची मागणीही वाढली आहे.
राज्यात सध्या 1500 ते 2000 मे. वॅट विजेची कमतरता भासत असल्याचे ऊर्जा खात्याने सांगितले आहे. ऑक्टोबरमध्ये 15000 मे. वॅटपेक्षा अधिक वीज मागणी आहे. पावसाच्या अभावामुळे पिकांसाठी पाणीपुरवठा करण्याकरिता देखील मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी आहे. दिवसाला 2 तास थ्रीफेज वीजपुरवठा करणेही कठीण होत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
यंदा जुलै महिन्यातील दोन आठवडे वगळता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने हुलकावणी दिल्यामुळे राज्यातील जलाशयांमध्ये कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जलविद्युत निर्मिती घटली आहे. शिवाय पवन विद्युत आणि सौर विद्युत निर्मितीही कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.
वीजपुरवठ्यातील समस्या दूर करण्यासाठी ऊर्जा खात्याने परराज्यातून वीज खरेदीचे प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तरप्रदेश, पंजाबसह वीजनिर्मिती अधिक असलेल्या राज्यांशी ऊर्जा खात्यातील अधिकाऱ्यांनी बोलणी केली आहे. राज्यात सध्या सर्व स्रोतांपासून 10,000 मे. वॅट वीजनिर्मिती होत आहे. उर्वरित केंद्राच्या ग्रीडकडून 3,000 मे. वॅट, परराज्यातून 1,000 मे. वॅट वीज उपलब्ध होत आहे. तर 2,000 मे. वॅट विजेची कमतरता भासत आहे.
मागील वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यावेळी दुप्पट वीजमागणी आहे. जुलै 2022 मध्ये कृषी क्षेत्रासाठी 1,425 मे. वॅट वीज वापरली गेली. यंदाच्या जुलै महिन्यात शेतीसाठी 2,209 मे. वॅट विजेचा वापर झाला आहे. लिंगनमक्की, वराही आणि सुपा जलाशयांच्या वीजनिर्मितीत 50 टक्के घट झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी पवनऊर्जेपासून 53.63 मे. वॅट वीजनिर्मिती झाली. तर 9 ऑक्टोबर रोजी हे प्रमाण 4.76 मे. वॅट पर्यंत खाली आले आहे.









