मंत्री शिवानंद पाटील यांची माहिती : उद्यमबाग येथे भूमिपूजन
बेळगाव : वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देणे, विणकरणांना उच्चप्रतिचे प्रशिक्षण देऊन वस्त्रोद्योग व रोजगार निर्मितीच्या उद्देशाने बेळगाव शहरात यंत्रमाग सेवा केंद्र (पॉवरलूम सर्व्हिस सेंटर) सुरू करण्यात येत असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. बुधवार दि. 18 रोजी उद्यमबाग येथे यंत्रमाग सेवा केंद्र तसेच केएसटीआयडीसीएल व्यवस्थापन कार्यालयाचे भूमिपूजन मंत्री शिवानंद पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यात एकूण 23,200 विजेचे माग (विद्युतमाग), 185 एअरजेट माग, 3900 रेपीयरमाग कार्यरत आहेत. या माग केंद्रांना यंत्रमाग सेवाकेंद्रामार्फत प्रशिक्षण देऊन आधुनिकीकरण केल्यास लोकर, रंग आणि कापडाचा दर्जा यांचे परीक्षण करणे शक्य होणार आहे. याशिवाय उत्तर कर्नाटकाच्या अन्य जिल्ह्यांनाही या प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.
यंत्रमाग सेवा केंद्राची इमारत उभारण्यात आल्यानंतर उत्तर कर्नाटकामधील विणकरांना आवाहन करून त्यांना उच्च प्रतीचे विणकाम प्रशिक्षण तसेच लोकर आणि कापड यांचे परीक्षण करणे यासंबंधी माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्रामधे एअरजेट, वॉटरजेट व रिपेरर मागांना इलेक्ट्रॉनिक यंत्रणा जोडण्यात येणार आहे. 2.21 कोटी रुपये खर्चातून विद्युतमाग सेवा पेंद्र उभारणार असून इमारतीचे बांधकाम वेळेत व दर्जेदार करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली असल्याचे मंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले. वस्त्रोद्योग खात्याच्या आयुक्त के. ज्योती, राज्य वस्त्रोद्योग मूलभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस. प्रकाश, वस्त्राsद्योग खात्याचे सल्लागार रमानंद कुलकर्णी, सहसंचालक शिवराज कुलकर्णी, उपसंचालक वासुदेव दोडमनी, एन. रविंद्र आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.









