सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
बेळगाव : बापट गल्ली कार पार्किंग येथे झाडाची फांदी कोसळून वीजवाहिन्यांनी पेट घेतल्याची घटना रविवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी साप्ताहिक सुटी असल्यामुळे या परिसरात नागरिक तसेच वाहनांची मोठी गर्दी होती. अग्निशमन जवानांना तात्काळ पाचारण करून ही आग आटोक्यात आणली. कार पार्किंग परिसरात अनेक जुनाट वृक्ष आहेत. त्यापैकी एका वृक्षाची फांदी थेट वीजवाहिन्यांवर कोसळली. वीजवाहिन्यांचे स्पार्किंग होऊन ही आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
परिसरात कार पार्किंगची व्यवस्था असल्यामुळे बेळगाव तसेच गोवा व कोकणातील अनेक वाहने या ठिकाणी पार्किंग करण्यात आली होती. वीजवाहिन्यांनी पेट घेताच सगळीकडे धावपळ सुरू झाली. काही नागरिकांनी हेस्कॉमला फोन लावून तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केली. वीजवाहिन्यांना लागलेली आग काही केल्या आटोक्यात येत नसल्यामुळे अखेर अग्निशमन विभागालाही पाचारण करावे लागले. त्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. परंतु, या गोंधळामुळे बघ्यांची गर्दी मात्र वाढली होती. सुदैवाने कोणतेही वाहन अथवा नागरिकांना याचा धोका पोहोचला नाही.









