विरोधकांच्या बैठकीसाठी बेंगळूरमध्ये 24 पक्षांची एकजूट
राजकीय रणनीती आज ठरणार : सोनिया-राहुल गांधींच्या उपस्थितीत ‘डिनर’
वृत्तसंस्था/ बेंगळूर
20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली राजकीय ताकद दाखविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवल्याचे दिसून येत आहे. सोमवारपासून विरोधी पक्षांची बेंगळूरमध्ये बैठक सुरू झाली असून ती दोन दिवस चालणार आहे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपने मंगळवारी दिल्लीत आपल्या मित्रपक्षांची बैठक बोलावली असून त्यात ‘एनडीए’ची ताकद दिसून येणार आहे.
बेंगळूरमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या भाजपविरोधी पक्षांच्या विरोधी आघाडीच्या बैठकीला उत्तर म्हणून एनडीएची दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये मंगळवारी मोठी बैठक होणार आहे. या बैठकीला भाजप व्यतिरिक्त 29 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. तर, विरोधकांची बैठक बेंगळुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवस चालणार असून, सोमवारीच या महामंथनमध्ये 24 पक्ष सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी 23 जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटणा येथे बोलावलेल्या बैठकीत 17 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. विरोधकांच्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे. विरोधकांच्या एकजुटीसाठी नाव निश्चित करणे, जागावाटप, निमंत्रक कोण असेल या मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे.
विरोधी पक्षांची बैठक बेंगळूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी सायंकाळी 6 वाजता ‘युनायटेड वुई स्टँड’ या घोषवाक्याखाली सुरू झाली. मल्लिकार्जुन खर्गे, नितीशकुमार यादव, लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक दिग्गजांचा या बैठकीत सहभाग आहे. सोनिया आणि राहुल गांधीही पोहोचले आहेत. दुसरीकडे, शरद पवार मंगळवारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जीही बैठकीला पोहोचले आहेत. तसेच आम आदमी पक्षाच्यावतीने अरविंद केजरीवाल, भगवंत मान, संजय सिंह आणि राघव चढ्ढा उपस्थित राहिले आहेत. सर्व उपस्थितांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्वागत केले.
रणनीती निश्चित होणार
सोमवारी सायंकाळी झालेल्या ‘डिनर’ बैठकीनंतर मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत पुन्हा सर्व नेत्यांची बैठक होणार आहे. बैठक आटोपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चर्चा-निर्णयांची माहिती दिली जाणार आहे. विरोधकांच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तीन प्रमुख मुद्यांवर चर्चा होऊ शकते. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट, जागा वाटप आणि आघाडीचे नवे नाव या मुद्द्यांवर सविस्तर विचारमंथन होणार आहे. याशिवाय समान नागरी कायदा, मणिपूर हिंसाचार, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका, पक्ष फोडण्याची भाजपची रणनीती आणि संसद अधिवेशनात आवाज उठविण्याचे मुद्दे यावरही चर्चा अपेक्षित आहे.
भाजपकडूनही जोरदार वातावरण निर्मिती
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी 17 जुलै आणि 18 जुलै रोजी आपली एकजूट दाखवून विरोधी पक्षांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात भाजपविरोधी वातावरण निर्माण करायचे होते. मात्र या सत्तासंघर्षात भाजपनेही आघाडी घेत 18 जुलैला एनडीएची बैठकही बोलावली आहे. यातून भाजप आपल्या वाढत्या ताकदीची जाणीव विरोधी एकजुटीला दाखवून देणार आहे.
बैठकीला उपस्थित 24 पक्ष
काँग्रेस, निजद, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, भाकप, माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राजद, सपा, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, सीपीआय (एमएल), आरएलडी, आययुएमएल, केरळ काँग्रेस, केरळ काँग्रेस (एम), एमडीएमके, व्हीसीके, आरएसपी, केएमडीके, एआयएफबी.









