फोंडा वगळता पाच तालुके होणार प्रभावित
मडगाव : वीज खात्याने रविवार दि. 21 मे रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 220 केव्ही शेल्डे सबस्टेशन, 220 केव्ही कुंकळळी सबस्टेशन व 110 केव्ही वेर्णा सबस्टेशन येथे वार्षिक देखरेख शटडाऊन नियोजित केले आहे. त्यामुळे वरील कालावधीत फोंडा तालुका वगळून संपूर्ण दक्षिण गोव्यात वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे वीज खात्याने कळविले आहे. यापूर्वी शटडाऊनचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामुळे ते शटडाऊन मागे घेण्यात आले होते. मात्र, येत्या रविवारी हे शटडाऊन नक्की करण्यात आले आहे. या दिवशी काणकोण, सासष्टी, सांगे, केपे, मुरगांव हे पाच संपूर्ण तालुके आणि धारबांदोडा तालुक्याचा भाग म्हणजे ग्रामपंचायत किर्लपाल-दाभाळ, ग्रामपंचायत शिगांव-कुळे, ग्रामपंचायत मोले व फोंडा तालुक्याचा भाग म्हणजे ग्रामपंचायत पंचवाडी या भागांना खंडित वीजपुरवठा होणार आहे. याची नोंद घेऊन वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वीज खात्याच्या अधीक्षक अभियंत्याने केले आहे.









