आपल्या राजीनाम्याच्या घोषणेने शरद पवार यांनी पक्षातील वर्चस्वाचा डाव तर जिंकलाच पण अंतिम शब्द आपलाच असेल हेही वदवून घेतले. भाजपचा मनसुबा उधळला, शिंदे गटाला सैरभर केले, देशातील नेतृत्वाचे लक्ष खेचून घेतले. शिवसेनेलाही धक्का दिला. सर्कशीत कितीही सिंह असले तरी सत्तेचे रिंगमास्टर आपणच हे त्यांनी दाखवून दिले. तेही न्यायालयीन निकालाच्या तोंडावर!
शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजता शरद पवार यांनी परतलेली भाकरी उतरवून पुन्हा तब्यात घेतली. तव्यासहित चूल सुद्धा त्यांच्या हातून जाते की काय अशी स्थिती बदलून त्यांनी ताबा घेतला आहे. आपला पक्ष म्हणजे कमीत कमी पाऊणशे सुभेदारांचा विधानसभा आणि जिल्हा ताब्यात ठेवणारा हुकमी नेतृत्वाचा समुच्चय आहे याची जाणीव पवारांना आहे. राष्ट्रवादीच्या या हमखास यशाच्या समीकरणाला गेल्या 25 वर्षात भाजपनेही अंगीकारून आमदारांचा आकडा 100 च्या पुढे नेला. तरीही हमखास सत्तेचे गणित काही त्यांना जमेना. एक भक्कम साथीदारासाठी मग शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याबरोबर मनात नसतानाही तडजोड करावी लागते.
आता स्वबळावरच पक्ष सत्तेवर यावा अशी भाजपची भावना झाली असून त्यातून त्यांनी शिंदे गटाला फोडून राष्ट्रवादीप्रमाणे हमखास जिंकणाऱ्यांचे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद देऊन राज्याच्या सत्तेची चव चाखायला देत त्यांना विलीन करून घेण्याचे मनसुबेही रचले. मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांची भक्कम एकजूट आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिलेली सहानुभूती यामुळे गेल्या दहा महिन्यात भाजप आणि शिंदे सेनेला मनाप्रमाणे कारभार करता आलेला नाही. उलट या प्रयोगाने भाजपची प्रतिमा अधिक खराब झाली असून निवडणुकीत त्याचा फटका बसेल असा अहवाल तावडे समितीने दिला आहे. त्यामुळेच अजित पवार यांना आपल्या बाजूने घेऊन पुढची वाट सुकर करण्याचा प्रयत्न भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने सुरू केला होता. या आठवड्यात राज्यातील सत्ता संघर्षाचा न्यायालयात निकाल लागणार आहे. तो विरोधात गेला तर सत्ता डळमळीत होऊ नये म्हणून एक हातचा असावा यासाठी भाजप नेतृत्वाचा प्रयत्न सुरू होता आणि त्यांच्या हाती अजितदादा लागल्याची चर्चा उठली. या परिस्थितीला अचूक पद्धतीने हेरत शरद पवार सावध झाले आणि त्यांनी आधीच हालचाली सुरू केल्या.
राहूल गांधी, उध्दव ठाकरे अशा नेत्यांना भेटून कल्पना दिली आणि आपण भाजपला साथ देणार नाही मात्र आपल्या पक्षात आगळीक घडू शकते याची कल्पना दिली. अजितदादांची काही वक्तव्ये पवारांना खटकली होतीच. नेमके लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशाच्या निमित्ताने त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला. तो जाहीर करण्यापूर्वी कुटुंबात सर्वांना कल्पना देण्यात आली होती मात्र पक्षातील कोणत्याही नेत्याला त्याचा सुगावा पवारांनी लागू दिला नव्हता. यामुळे 27 एप्रिलला जाहीर केलेल्या भाकरी परतवण्याच्या घोषणेपासून पाच मेच्या सायंकाळपर्यंत जे नाट्या घडले ते चक्रावून टाकणारे होते. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अजितदादांनी आक्रमकता दाखवली होती. त्यांचे पाठबळही नजरेत भरणारे होते. जयंत पाटील यांच्यासह इतर सर्व नेते ज्या पद्धतीने हतबल दिसत होते त्यावरून आता हा पक्ष पवारांच्या हातून निसटतोय असे वातावरण निर्माण झाले. मात्र त्या परिस्थितीतही पवार निश्चलपणे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले. हे करताना त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या असे समजते. ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती ती अजित पवारांपासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांच्या चुका त्यांनी पुस्तकातून आधीच जाहीर केल्या. ठिकठिकाणी त्यांचे कौतुकही केले. जेव्हा राष्ट्रवादीतील हे नेते भेटायला आले तेव्हा पवारांनी तुमची चर्चा नेमकी कुणाशी सुरू आहे? अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे का? हे विचारून घेतले. या नेत्यांनी आपण राज्यातील स्थानिक नेतृत्वाशी बोललो असल्याचे सांगितले आणि हा कच्चा दुवा पकडत पवारांनी, जर त्या नेत्यांनाच राष्ट्रीय नेतृत्वाने बाजूला केले तर? तुम्हाला दिलेला शब्द कोण पाळणार? सुरू केलेल्या चौकशी फक्त थांबवल्या जातात, बंद होत नाहीत अशी काही विधाने केली. असे समजते की ज्यामुळे भाजपसोबत जाण्याचा विचार करणाऱ्यांच्या तंबूमध्ये खळबळ उडाली.
पवार येणार असतील तरच आणि त्यांच्या संमतीनेच भाजपसोबत जायचे अन्यथा नाही असा विचार त्यांना करावा लागला आणि आपण भाजपसोबत जाणार नाही इतरांना कुणाला निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर घ्यावा असे सांगून पवारांनी त्यांना अडचणीत आणले आणि बाहेरचा रस्ता खुला ठेवला आहे. या प्रकारानंतर मात्र राष्ट्रवादीतील भाजप सोबत जाऊ इच्छिणाऱ्यांच्या शिडातील हवा उतरल्याचे स्पष्ट झाले. अखेर पवारांचा राजीनामा मंजूर करायचा नाही असे आधी राजीनामाचे समर्थन करणाऱ्या अजित पवार यांनाही मान्य करावे लागले. मात्र या निमित्ताने अजितदादांच्या बाजूने सहानुभूती थोडी वाढल्याचेही जाणवले. तर भविष्यात सुप्रिया सुळे यांचे पक्षात महत्त्व वाढेल हेही लक्षात आले. घोषणा करण्यासाठी शरद पवार यांनी जयंत पाटील येईपर्यंत पत्रकार परिषद थांबवली आणि नंतर जिल्हा व राज्यात दहा-पंधरा वर्षे काम केलेल्यांना पुढे प्रमोशन दिले जाईल असे सांगून पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलाचे संकेत दिले.
या सगळ्या प्रकारात खुद्द जयंत पाटील यांच्या बद्दलसुद्धा अजितदादा गटातील दबलेल्या मंडळींचा विरोध उफाळून आल्याचे समजते. पवारांनी या गोष्टीची बारकाईने दखल घेतल्याची चर्चा आहे. त्यातून ऐनवेळी पवारांच्या भूमिकेमुळे गोंधळलेल्या मंडळींना सुद्धा दिलासा मिळणार असून जयंतरावांवर खापर फोडून ते आमदार, नेते अजितदादांना दिलेल्या पाठिंबाचे समर्थन करण्याची सोय करण्यात आली आहे. चुका केलेल्यांनाही सुधारण्याची संधी देऊन त्यांना बाजूला जाऊ द्यायचे नाही आणि पक्ष सोडून गेला तरी त्याच्याशी संपर्क तोडायचा नाही ही पवारांची संवादाची कला त्यांना प्रत्येक वेळी उपयोगात येते तशी यावेळी आली. विविध पक्षीय राष्ट्रीय नेत्यांनाही आपल्या अस्तित्वाची त्यांनी जाणीव करुन दिली.
शिवराज काटकर








