सातारा प्रतिनिधी
या राज्यातील शेतकऱ्यांची पोरं बेरोजगार आहेत. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गायीम्हैशी कर्ज काढून घेतात. ते कर्ज फेडण्यासाठी राबतात. पण दुधाला दरच मिळत नसल्याने घातलेले भागभांडवल सुद्धा निघत नाही. त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आहे. तीन चाकी सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. त्यामुळे आणखीन एक राज्याला मुख्यमंत्री करावेत, अशी मागणी करत दुधाला सरकारने दर द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेने शिवथर येथे रस्त्यावर दुध ओतून सरकारचा निषेध नोंदवला. दुध दराचा भडका सातारा जिल्ह्यात उडाला आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप साबळे यांच्या नेतृत्वाखाली शिवथर येथे दुध दराच्या प्रश्नी आंदोलन करण्यात आले. यावेळी देवानंद साबळे, नाना साबळे याच्यासह शिवथर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रस्त्यावर दुध ओतून शेतकरी संघटनेचा विजय असो, दुध आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच दुधाला दर मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी दुध उत्पादक शेतकरी जीवन साबळे म्हणाले, शासनाने ३४ रुपये दराचा अद्यादेश काढला आहे. त्याचे उल्लघंन करुन डेअरी चालकांकडून होत आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांना २७ ते २८ रुपये दर दिला जात आहे. शेतकऱ्यांना दुध व्यवसाय परवडत नाही. शासनाने त्वरीत निर्णय घेवून दर द्यावा, अशी मागणी केली आहे.
शेतकरी संघटना किसान मंच महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष संदीप साबळे म्हणाले, सध्या शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे. दुष्काळ पडलेला आहे. शासन झोपलेले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्या हाताला काम नाही. बेरोजगार आहेत. त्या पोरांनी कर्ज काढून गायी, म्हैसी घेतल्या आहेत. दुध काढून डेअरीला घातले तर डेअरीकडून दुधाला दर नाही. त्यामुळे त्यातून भागभांडवल मिळत नाही, दुधाचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. जसे ऊस कारखान्याला घातला तरीही त्याची वुईटी सुद्धा वाया जात नाही. तसाच प्रकार दुधाच्या बाबतीत आहे. दुधाचे वेगवेगळे पदार्थ बनतात. तरीही दर दिला जात नाही. तीन चाकावर चाललेले हे सरकार निष्क्रीय आहे. सरकारला शेतकऱ्याचे काही घेणेदेणे नाही. आहे. अजून एक मुख्यमंत्री झाला पाहिजे. तेव्हा ते सरकार चार चाकावर स्थिर चालेल. तेव्हा शेतकऱ्यांना न्याय मिळेल. दुध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैशीच्या दुधाला ८० रुपये, गायीच्या दुधाला ४० रुपये दर देण्यात यावा, तसेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दुध उत्पादकांना ५ रुपये अनुदान देण्यात यावे असे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी दुध उत्पादक संघ, डेअरी चालकांनी केली नाही. ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.









