ग्रामस्थांचे बैलूर ग्राम पंचायत अध्यक्षांना निवेदन
खानापूर : कौलापूरवाडा येथे सर्व नियम धाब्यावर बसवून क्वॉलिटी अॅनिमल फिड्स यांनी हॅचेरी प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी काम हाती घेतले आहे. यापूर्वी या प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला असून याबाबत वरिष्ठ पातळीवर विरोध नोंदविलेला आहे. त्याचप्रकारे बैलूर पंचायतीच्या नूतन अध्यक्षांनीही ग्राम पंचायतीकडून कोणताही परवाना देऊ नये, अशा मागणीचे निवेदन कौलापूरवाडा ग्रामस्थ आणि लोपेश्वर देवस्थान कमिटीने बैलूर ग्रा. पं. अध्यक्षा अरोही सावंत यांना देण्यात आले. अरोही सावंत यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण बैठकीत योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. निवेदन देताना भैरु पाटील म्हणाले, कौलापूरवाडा येथे क्वॉलिटी अॅनिमल फिड्स या कंपनीने गेल्या पंधरा वर्षांपूर्वी पोल्ट्री फार्म सुरू केला आहे. मात्र या पोल्ट्री फार्मला सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही परवाने देण्यात आलेले नसताना ही पोल्ट्री सुरू करण्यात आली. ही पोल्ट्री कौलापूरवाडा गावाला लागून असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासाठी कौलापूर ग्रामस्थांनी यापूर्वीही वरिष्ठ पातळीपर्यंत पोल्ट्री फार्म बंद करण्यासाठी आंदोलन केले आहे. याची दखल घेऊन पर्यावरण विभागाने 31 मार्च रोजी पोल्ट्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र क्वॉलिटी अॅनिमल फिड्सकडून पोल्ट्री फार्म बंद करण्यात आलेला नाही. मात्र या ठिकाणी नव्याने हॅचेरी प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी बांधकाम करण्यात येत आहे. कौलापूरवाडा ग्रामस्थांनी हॅचरी व पोल्ट्री फार्म विरोधात संबंधित खात्याबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे. हॅचेरी प्रोजेक्टला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. असे असताना पोल्ट्री बंद न करता पुन्हा नव्याने हॅचेरी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बैलूर ग्रा. पं. च्या अध्यक्षपदी अरोही सावंत यांची निवड नुकतीच झाली आहे. क्वॉलिटी अॅनिमल फिड्सच्या प्रकल्पांना कोणतेही परवाने देऊ नयेत, अशा मागणीचे निवेदन कौलापूरवाडा ग्रामस्थांनी बैलूर ग्राम पंचायत कार्यालयात भेट घेऊन दिले आहे. यावेळी सखुबाई पाटील, भैरु पाटील, चिंचू येडगे, रामा येडगे, ढोलू जंगली, गंगाराम येडगे, नवलू खारवत, बाबू पाटील, अप्पू शिंदे, बाबू बावदने यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









