केंद्रीय ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार : 260 लाभार्थ्यांना चाकांचे वितरण
वार्ताहर/नंदगड
कुंभारी कला पूर्वापार चालत आलेली कला आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी सरकारकडून नेहमीच प्रोत्साहन देण्यात येते. यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. जास्तीत जास्त युवकांनी याचे प्रशिक्षण घेतल्यास रोजगार निर्मितीत वाढ होणार आहे. कुंभारी कलेच्या वाढीसाठी आयोग नेहमीच पुढे राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार (दिल्ली) यांनी दिली. खानापूर येथील शनया पाल्ममध्ये झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग यांच्यावतीने 260 लाभार्थ्यांना स्वयंचलित कुंभारी चाकांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी मनोज कुमार बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर होते. मनोज कुमार पुढे म्हणाले, ग्रामोद्योगाच्या माध्यमातून चार लाख महिलांना रोजगार मिळाला आहे.
ग्रामीण भागात लघू उद्योजकांना वाव आणि रोजगार निर्मिती यावर भर दिला जात असून सर्वांनी मातीच्या वस्तूंचा वापर करून परिसर संरक्षणावर भर द्यावा. आमदार विठ्ठल हलगेकर यावेळी म्हणाले, समाजात कुंभार समाजाने आपला पूर्वापार व्यवसाय टिकवून ठेऊन मोठे योगदान दिले आहे. कुंभारी व्यवसायाच्या कौसल्यासाठी प्रोत्साहन देऊन सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी विभागीय कार्यकारी अधिकारी मदनकुमार रेड्डी, सावित्रम्मा दळवाई, सत्यनारायण भट, प्रिया पुराणिक, नरेंद्र कुमार आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चार महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विविध राज्यातील 260 लाभार्थ्यांना विद्युत चाकांचे वितरण करण्यात आले. खानापूरसह विविध राज्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.









