कोल्हापूर / इम्रान गवंडी :
गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपला असताना कोल्हापुरातील बापट कॅम्प, गंगावेश आणि शाहूपुरी परिसरातील कुंभार गल्ल्यांमध्ये गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग जोमात सुरू झाली आहे. कुंभार बांधव बाप्पांची मूर्ती घडविण्यात व्यस्त असुन कुंभार गल्ल्यातील रात्री जागू लागल्या आहेत.
घरगुती गणेशमूर्तींचे काम 50 टक्के पूर्ण झाले असुन शहरासह उपनगरात आकर्षक, सुबक व देखण्या गणेशमुर्तींचे लागलेले स्टॉल लक्ष वेधुन घेत आहेत. घरगुती गणेश मूर्ती बुकींग करण्यासाठी नागरिक कुटुंबीयांसोबत बापट कॅम्प, शाहूपुरी, गंगावेस येथील कुंभार गल्ल्यांमधील स्टॉलवर गर्दी करत आहेत.
मंडळाच्या गणेश मूर्तींचे पॉलीश व फिनिशिंगचे काम वेगाने सुरू आहे. काही मोठ्या गणेशमूर्त्यांच्या कच्चे काम उरकुन घेण्याची घाई सुरू आहे. मंडळाचे कार्यकर्ते वर्गणी व इतर कामात व्यसत असल्यामुळे अद्यापही मंडळाच्या गणेशमुर्तींचे बुकींग करण्यास वेग आलेला नाही.

- आकर्षक मूर्तींना मागणी
घरगुती गणेश मूर्तींचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. बहुतांश मूर्ती विक्रीसाठी तयार असून बुकिंग प्रक्रियेला वेग आला आहे. शाडू माती आणि पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) पासून बनविल्या जाणाऱ्या मूर्तींची मागणी वाढत आहे. गणेश मूर्तींची पाहणी करण्यासाठी कुटुंबीयांसह नागरिक कुंभार गल्लीत येत असून, आकर्षक आणि देखण्या मूर्तींची निवड करण्यात व्यस्त आहेत. मंडळांच्या गणेश मूर्तींच्या कामालाही गती मिळाली आहे. सध्या मूर्तींचे फिनिशिंग आणि रंगकाम यावर विशेष लक्ष दिले जात आहे.
- शाडूच्या गणेशमूर्तींची किंमत अधिक
कुंभार गल्ल्यातील गणेश मूर्तींच्या किंमती आकार, सुबकता, सजीवपणा व वापरलेलया साहित्यावर अवलंबून आहेत. यंदा पीओपीवरील बंदी उठवली असली तरी शाडूच्या गणेशमूर्तींची किंमत अधिक आहे. शाडू मातीच्या सव्वा फूट मूर्तीची किंमत अडीच हजार रुपये आहे. तर पीओपीची दीड फूट मूर्ती: पंधराशे ते दोन हजार रूपये अशी आहे. शाडूच्या दीड फूट मूर्तीची किंमत 3 हजार रुपये तर
अँटिक आणि खास डिझाईनच्या मूर्तींची किंमत साडेचार ते 5 हजार रुपये आहे. मंडळांच्या गणेश मूर्तींच्या किंमती आकारानुसार 5 हजार रुपयांपासुन 50 हजार रुपयांपर्यंत आहेत.

- मूर्ती कमी पडण्याची शक्यता
पीओपीचा निर्णय उशिरा घेतल्यामुळे मूर्ती घडविण्याच्या कामाला विलंब झाला आहे. आता केवळ दीड महिन्याचा कालावधी बाकी असल्यामुळे मागणीच्या तुलनेत मूर्त्यांचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे गणेश मूर्तीं कमी पडण्याची शक्यता असल्याचे कुंभार बांधवांनी सांगितले.
- पावसाची उघडिप अन् कामाला वेग
पावसाने उसंत घेतल्यामुळे मूर्ती तयार करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. मातीच्या मूर्तींवर येणारा ओलावा व इतर अडचणी कमी झाल्या आहेत. यामुळे कारागिरांना मूर्तींचे फिनिशिंग आणि रंगकाम यावर लक्ष केंद्रित करता येत आहे.
- रात्री उशिरापर्यंत काम सुरू
पावसाने दिलेल्या उसंतमुळे कामाचा वेग आला आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे सुबक व दर्जेदार मूर्तीं घडविल्या जात आहेत. पीओपीवरील निर्णय उशिरा झाल्यामुळे मूर्तींच्या कामाला थोडा विलंब झाला आहे. मूर्ती वेळेत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत आहे.
-संदीप रघुनाथ माजगावकर, कारागीर कुंभार गल्ली, शाहूपुरी
- नागरिकांकडून बुकींगला सुरूवात
परगावी जाणाऱ्या मूर्ती तयार झाल्या असुन निर्यातीचे काम सुरू आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बुकींगचे प्रमाण वाढणार आहे. घरगुती गणेशमुर्तींचे 50 टक्के काम पुर्ण झाले आहे. पुढील महिन्यात कामाला आणखी वेग येणार आहे.
-सुनिल माजगावकर, कारागिर, बापट कॅम्प








