वाहनधारकांचे हाल : त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
वार्ताहर/नंदगड
खानापूर शहरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या रूमेवाडी क्रॉसजवळच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना त्रास सोसावा लागत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे. बेळगाव-कारवार रस्त्यावर रूमेवाडी क्रॉसजवळ खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटारीतून व्यवस्थित पाणी जात नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी गेल्याने खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरून एखादे चारचाकी वाहन जात असताना खड्ड्यांतील घाण पाणी पादचाऱ्यांच्या व दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर उडून पडण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे वादावादीचे प्रसंग वाढत आहेत.
बेळगावपासून खानापूर, रामनगरमार्गे कारवारला जाण्यासाठी व बेळगावहून पणजीला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. शिवाय या रस्त्यावरून गुंजी, लोंढा दांडेली, जोयडा, रामनगर, असू, कॅसलरॉक, जगलबेट, गणेशगुडी भागात जाण्यासाठी तसेच नंदगड, बिडी, कित्तूर, हल्याळला जाण्यासाठीही या रस्त्याचा उपयोग होतो. खानापूर मासळी बाजारापासून गोवा क्रॉसपर्यंत जवळपास दिड कि. मी.चा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्यात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी चरी पडल्या आहेत. सायंकाळी अंधारात खड्डे दिसत नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत.









